नागपूर, 15 जुलै: मनुष्य आणि श्वान यांच्यातील संबंध फार जुना असून श्वान हा पूर्वापार मनुष्यासोबत राहत आला आहे. सध्या अनेक देशी आणि विदेशी प्रजातीचे श्वान पाळले जातात. आपल्या घरी देखील एखादे श्वान असावे असे अनेकांना वाटत असते. मात्र त्याच्या जडघडणीत योग्य प्रशिक्षण आणि श्वानाची सर्वार्थाने परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. श्वानाच्या प्रशिक्षणाने श्वान मानसिक शारीरिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम होत असतो. त्यामुळे श्वानाच्या जडणघडणीत प्रशिक्षण हा एक महत्त्वाचा भाग असल्याचे मानले जाते. त्यामागील नेमकी कारणे काय आहेत हे नागपुरातील श्वान अभ्यासक आणि श्वान प्रशिक्षक श्रीकांत वाढी यांच्याकडून जाणून घेऊया. श्वान प्रशिक्षणाची गरज श्वान प्रशिक्षणाचे अगदी बेसिक कारण म्हणजे जेव्हा आपण एखादे लहान पपी अथवा कुठल्याही वयोगटाच्या श्वान घरी आणतो, त्यावेळी त्याच्या राहणीमानात चांगल्या सवयी, शिस्त आणि त्याचा सर्वार्थाने विकास घडवून आणणे हा असतो. कारण कुठलाही श्वान त्याच्या 14-15 वर्षाच्या आयुष्यातील सर्वाधिक काळ आपल्या सोबत घालवणार आहे. त्यामुळे श्वान आपल्या सोबत घरात वावरत असताना घरातील वावर कसा असावा. घरातील वस्तूंचे, व्यक्तींचे महत्व काय आहे? त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने काय आवश्यक आहे? घरी पाहुणे अथवा इतर कोणी आल्यास कसे वागावे? श्वान पालकांनी आज्ञा दिल्यावर ती अमलात आणावी, अशा असंख्य गोष्टी प्रशिक्षणाचा भाग आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे, असे वाढी सांगतात.
प्रशिक्षण म्हणजे केवळ सीट अँड अप्स नाही दैनंदिन जीवनात श्वान आपल्या सहवासात राहत असतो. प्रत्येक श्वानाच्या प्रजातीनुसार त्याच्या स्वभाव, आवडी निवडी, शरीर इत्यादी बऱ्याच गोष्टीत फरक आढळून येतो. त्यामुळे त्या-त्या श्वानानुसार त्यांच्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक क्षमतेत विभिन्नता आढळून येते. बहुतांश वेळी असे लक्षात आले आहे की श्वानला ट्रेनिंग देतेवेळी कुठलेतरी खाद्य दाखवून त्याच्याकडून आज्ञेचे पालन करून घेतलं जातं. मात्र ते केवळ तात्पुरत्या स्वरूपाचे असतं. खाण्याच्या आमिषा पोटी श्वान ते कृत्य करून देखील घेतो. मात्र तो खऱ्या ट्रेनिंगचा भाग नाही. सुरुवातीच्या काळात ही गोष्ट केली असता ठीक आहे मात्र त्याच्या व्यक्तिगत जीवनात त्याने शिस्त आणि श्वानपालकांनी दिलेल्या आज्ञा पाळणे हा ट्रेनिंगचा भाग असतो, असे श्वान प्रशिक्षक श्रीकांत वाढी सांगतात. श्वान पाळणे इतकं सोप्पं नाही, आधी ही माहिती जाणून घ्या तर श्वानाच्या बौद्धिक क्षमतेला गती मिळेल श्वानांच्या जडणघडणीमध्ये मेंटल स्टॅम्युलेशन आणि फिजिकल एक्सरसाइज फार महत्त्वाचे असते. त्यामुळे त्याच्या बौद्धिक क्षमतेला गती प्राप्त होऊन तो स्वतंत्र विचार करतो. बऱ्याचदा आपण सोशल मीडियावर श्वानांचे व्हिडिओ बघतो. ज्यात श्वानाने स्वतःच्या डोक्याने काहीतरी अप्रतिम कृत्य केलं किंवा मनुष्याला मदत केली असे त्यात दाखवण्यात येत असतं. हा देखील एक ट्रेनिंगचाच पार्ट आहे. श्वान अतिशय हुशार आणि आज्ञाधारी असल्याने त्याला उत्तम प्रशिक्षण दिल्यास तो अशक्यप्राय गोष्टी देखील सहज करू शकतो. त्यामुळे श्वानांना प्रशिक्षण देणे फार महत्त्वाचे आहे, असेही वाढी सांगतात.