विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 15 जून: भारतीय सैन्य दलात दाखल होऊन देशासेवेची संधी मिळावी यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी शर्थीचे प्रयत्न करत असतात. मात्र ही संधी फार थोड्या लोकांच्या नशीबी येत असते. भारतीय सैन्य म्हणजे पराक्रम, साहस आणि त्यागाचे सर्वोच्च प्रतीक आहे. स्वतःला देशासाठी समर्पण करत मातृभूमीचे रक्षण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागपुरातील आदेश कुराणी या तरुणाने प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रत्नाच्या जोरावर भारतील नौदलात सब लेफ्टनंट म्हणून आपले स्थान सुनिश्चित केले आहे. विशेष म्हणजे आदेश हा श्री दशा सोरठिया वणिक गुजराती समाजातून तो या पदावर जाणारा पहिला तरुण ठरला आहे. तसेच इंडियन नेवल अकॅडमीच्या 2022-23 या सत्रातील तो नागपुरातील एकमेव कॅडेड ठरला आहे. पहिल्यांदा आलं अपयश आदेश यानं सांगितलं की, शालेय शिक्षण नागपुरातील भवन्स विद्या मंदिर, आष्टी येथून पूर्ण केल्या नंतर भारतीय सैन्यदलाबद्दल विशेष आकर्षण होतं. त्याच दरम्यानच्या काळात आपण देखील आपलं करियर या क्षेत्रात करावं आणि देशसेवेचे व्रत स्वीकारावं अशी फार इच्छा होती. त्यासाठी मी नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात एनडीएची परीक्षा दिली. दुर्दैवाने मला त्यात अपयश आलं. त्यानंतर मात्र मी खचून न जाता कायम प्रयत्नशील होतो.
मैत्रिणीची संगत, ध्येय एक असल्याचा फायदा रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट मधून इलेक्ट्रोनिक अँड कम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंग करत असताना तिथे माझी ओळख एका मैत्रिणीशी झाली. सुदैवाने आमचे ध्येय एक असल्याने आमची मैत्री अधिक घट्ट झाली. या मैत्रिणीच्या घरातील व्यक्ती सैन्यदलात कार्यरत असल्यामुळे माझ्या डोक्यातील बऱ्याच शंका दूर झाल्या. मला इत्यंभूत माहिती मिळाली त्यामुळे पुढील मार्ग अधिक सुखकर आणि सोपा झाला. एससीबीच्या 4 परीक्षेत यश इंजिनिअरिंग करत असतांना मी सर्विस सिलेक्शन बोर्डच्या परीक्षेची तयारी करत होतो. तेवढ्यात मला एका खासगी कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. जॉब आणि परीक्षेची तयारी दोन्ही सोबत सुरू असताना मी एससीबीची परीक्षा 4 वेळा दिली. त्यात माझी नेव्ही आणि आर्मीत अशी 2 वेळा निवड झाली. मात्र माझ्या दातांचा त्रास उमळला आणि मला अनफीट म्हणून घोषित केले गेले. मात्र त्यावर अल्पावधीत मात करत मी परत अपील केले आणि माझा पुढील मार्ग मोकळा झाला, अशी माहिती आदेश कुराणी याने बोलताना दिली. आता बिनधास्त प्या समुद्राचं पाणी, सोलापूरच्या संशोधकांनी बनवलं अनोखं यंत्र, Video इंडियन नेव्हल अकॅडमी येथे प्रशिक्षण केरळ तेथे असलेल्या इंडियन नेव्हल अकॅडमी येथे माझे 6 महिने प्रशिक्षण झाले. त्यात एक नेव्हल ऑफिसरचे कर्तव्य, काम आणि जवाबदारी या बद्दल सविस्तर शिकवण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण करून 27 मे 2023 रोजी पासिंग आऊट परेड केली आणि आता माझी पोस्टिंग लोणावळा येथे आहे. आमच्या या अभ्यासक्रमात एक बाब शिकवली जाते ती म्हणजे राष्ट्र प्रथम, त्या नंतर आपले साथीदार, त्यानंतर माझं कुटुंब आणि त्या नंतर ही काही उरलं तर मग मी. आज देशासाठी मला काही करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो अशी भावना आदेश कुराणी यानं व्यक्त केली. गुजराती समाजातून पहिलाच नौदल अधिकारी श्री दशा सोरठिया वणिक गुजराती समाजातून आदेश पहिलाच नौदल अधिकारी ठरला आहे. कुटुंबातील वंश परंपरागत चालत आलेला व्यवसाय न करता त्याने आपले करियर देशसेवेसाठी निवडले आणि त्यात यश संपादन केले आहे. हा आमच्या साठी आज सर्वात अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. आम्ही ज्या श्री दशा सोरठिया वणिक गुजराती समाजातून येतो त्या समाजात आजवर या पदावर जाणारा पहिला तरुण आदेश ठरला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून आज आदेशाचे कौतुक होत आहे, अशी भावना आदेशच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.