नागपूर, 8 सप्टेंबर : नागपूर जिल्ह्यात एका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी महिलेला लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. अनिता कृष्णराव तेलंग (वय-55) असे या लाचखोर महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. मानधनाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याकडून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी त्यांना रंगेहाथ अटक केली. काय आहे संपूर्ण प्रकरण - याप्रकरणी स्वाती बंडू धनविजय (वय-25, रा. चिखली, ता. भिवापूर) या तरुणीने तक्रार केली होती. स्वाती धनविजय ही पंचायत समितीच्या घरकुल विभागात कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंता म्हणून मानधन तत्त्वावर कार्यरत आहे. लाभार्थ्याच्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून प्रतिघरकूल तिला 950 रुपये मानधन मिळते. अशा प्रकारे स्वाती धनविजय व अन्य एक कंत्राटी कर्मचारी अशा दोन्ही कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यांचे तब्बल 1 लाख 1 हजार 403 रुपये मानधन थकीत आहे. पैशांची मागणी - स्वाती मागील काही दिवसांपासून हे मानधन मिळण्यासाठी गटविकास अधिकारी अनिता तेलंग यांच्याकडे चकरा मारत होती. मात्र, मानधनाच्या देयकावर स्वाक्षरी करून ते मंजुरीसाठी सामान्य सेवा केंद्राकडे (सी. एस. सी.) पाठविण्याकरिता गटविकास अधिकारी तेलंग या स्वातीकडे पैशांची मागणी करत होत्या. या त्रासाला स्वाती कंटाळल्या होत्या. त्यामुळे स्वाती धनविजय यांनी सोमवारी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने बुधवारी सापळा रचला आणि पंचायत समितीचे कार्यालय गाठत. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. तक्रारकर्ती स्वाती धनविजय ही गटविकास अधिकारी अनिता तेलंग यांच्या दालनात पोहोचली होती. तिच्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना तेलंग यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. तेलंग या वादग्रस्त अधिकारी - मार्च 2022मध्ये भिवापूर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी अनिता तेलंग या रूजू झाल्या. तेव्हापासूनच त्यांच्या लाचखोर प्रवृत्तीमुळे पंचायत समितीचे वर्तुळ त्रस्त होते. यापूर्वी कुरखेडा येथे कार्यरत असताना तेलंग यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे. त्यामुळे तेलंग याची कुरखेडा येथून हकालपट्टी करण्यात आली होती. तसेच त्यांना भिवापूर येथे पाठविण्यात आले. आता याठिकाणी तेलंग यांनी सहा महिन्यातच येथील अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना त्रासवून सोडले. त्यात त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली. हेही वाचा - नदीत वाहून गेलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी गेला अन् स्वतःही…; नागपुरातील थरार, Live Video
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या नेतृत्त्वात पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे, प्रीती शेंडे, सारंग बालपांडे, गीता चौधरी, करुणा सहारे, अस्मिता मेश्राम, आशू श्रीरामे, अमोल भक्ते यांनी केली.