गोंदिया, 22 फेब्रवारी : राज्यात दिवसेंदिवस भयानक घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या तसेच आत्महत्येच्या घटना घडत आहेत. त्यातच गोंदियातील एका महिलेसोबत भयानक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीसोबत मुलगा आणि सासऱ्याला जिवंत जाळल्याची घटना घडली होती. 14 फेब्रुवारीला ही धक्कादायक घटना घडली होती. यात त्यात सासऱ्याचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर एका दिवसाने मुलाचा मृत्यू झाला. तर सात दिवस मृत्युशी झुंज देणाऱ्या ‘आरती’चाही मंगळवारी मृत्यू झाला. आरती किशोर शेंडे (30), असे मृत पत्नीचे तर किशोर श्रीराम शेंडे (वय 40, रा. भिवापूर, ता. तिरोडा) असे माथेफिरू आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी पती हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याने आरती ही आपला मुलगा आणि मुलीला घेऊन माहेरी सूर्याटोला आली होती. मात्र, माहेरी घरकाम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या पत्नीला आरोपी पतीने सुखाने जगू दिले नाही. आरोपी पतीने तिथे येऊन पेट्रोल ओतून सासऱ्यासह पत्नीला आणि मुलाला पेटवून दिले. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर्याटोला येथे 14 फेब्रुवारीला ही घटना घडली. त्यात सासरा देवानंद शीतकू मेश्राम (52) यांचा 15 फेब्रुवारी रोजी पहाटेच मृत्यू झाला. तसेच आरोपी किशोर शेंडे याचा मुलगा जय किशोर शेंडे (5, रा. भिवापूर) या चिमुकल्याचा नागपूर येथे 15 फेब्रुवारी रोजी रात्री मृत्यू झाला. यानंतर आरोपीची पत्नी आरती किशोर शेंडे (30) ही मृत्यूशी झुंज देत असताना तिची प्राणज्योत 21 फेब्रुवारी रोजी सकाळी मालवली. हेही वाचा - विविध नंबरवरुन महिलांना केला व्हिडिओ कॉल, अश्लील कृत्यही केले, अखेर….
किशोर हा पत्नी आरतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण करून मारहाण करायचा. या मारहाणीला त्रस्त होऊन आरती माहेरी आली होती. माहेरी आल्यावरही त्याने भांडण केले होते. यातून हे कृत्य केले आहे, असे समीर देवानंद मेश्राम (वय 28, रा. सूर्याटोला) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मुलगी झाली पोरकी - 14 फेब्रुवारी रोजी स्वरांजली दिवसाला भावासोबत खेळली. मात्र, रात्री स्वरांजली ही आपल्या आत्याकडे झोपायला गेली होती व त्यामुळे ती या घटनेपासून वाचली. वडिलांच्या अमानुष कृत्याने आजोबा, आई व भावाचा जीव गेला. स्वरांजली पोरकी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपीवर रामनगर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपी जावई किशोर श्रीराम शेंडे याला भिवापूर येथील शेतशिवारातून रामनगर पोलिसांनी 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अटक केली. न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी संपताच न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे.