नागपूर, 3 जून : ओबीसी आरक्षणावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. याला कारण ठरलंय ‘लाव रे व्हिडीओ’. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलतर्फे दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन नागपूरमध्ये करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी आरक्षण मिळण्यापूर्वीचा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा व्हीडिओ दाखविला होता. यावरुन भाजपने राष्ट्रवादीला लक्ष्य केलं आहे. सोयीची चोरी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा धंदाच, अशी टीका करत भाजपने फडणवसींचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. काय आहे प्रकरण? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलतर्फे नागपुरातील रेशमबाग येथील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे. नागपुरात होणाऱ्या ओबीसी शिबिराने भाजप घाबरली असून त्यांचा मतदार हिस्कावला जाणार या भीतीने महावितरणने संमेलन स्थळावरील वीज देखभालीच्या नावाखाली खंडित केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. दरम्यान, कार्यक्रमात राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ओबीसी आरक्षण मिळण्यापूर्वीचा जुना व्हिडीओ लावत भाजपवर टीका केली होती. यावर भाजपनेही पलटवार करत फडणवीस यांचा आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
स्वार्थी चोरी करणार्या
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 3, 2023
‘लाव रे तो व्हीडिओ’वाल्यांसाठी...
राष्ट्रवादी काँग्रेसने आज नागपूरच्या ओबीसी मेळाव्यात ओबीसी आरक्षण मिळण्यापूर्वीचा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा व्हीडिओ दाखविला.
1/2 pic.twitter.com/xfhyTaw0Ka
भाजपचे व्हिडीओच्या माध्यमातून राष्ट्रवादीला उत्तर भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन राष्ट्रवादीच्या लावरे व्हिडीओला उत्तर देण्यात आलं आहे. “स्वार्थी चोरी करणार्या ‘लाव रे तो व्हीडिओ’वाल्यांसाठी. राष्ट्रवादी काँग्रेसने आज नागपूरच्या ओबीसी मेळाव्यात ओबीसी आरक्षण मिळण्यापूर्वीचा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा व्हीडिओ दाखविला. पण, धुर्तपणा इतका की, 20 जुलै 2022 रोजी ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतरचा (म्हणजे हे सरकार आल्याबरोबर 20 दिवसांत आरक्षण मिळाल्याचा) व्हीडिओ दाखविला नाही. असो, सोयीची चोरी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा धंदाच! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 जुलै 2022 रोजीच्या पत्रकार परिषदेतील व्हीडिओ)” असं ट्विट फडणवीस यांच्या ट्विटसह करण्यात आलं आहे. शिबिराला दिग्गज नेते उपस्थित राहणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या शिबिराला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. 4 जून रोजी होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमाला शरद पवारांसह इतर सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

)







