मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपुरात स्वाईन फ्लूचा धोका वाढतोय, 14 टक्के रुग्णांना रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरची गरज

नागपुरात स्वाईन फ्लूचा धोका वाढतोय, 14 टक्के रुग्णांना रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरची गरज

शहरांसोबत ग्रामीण भागामध्ये देखील स्वाईन फ्लूचे रुग्ण पाहायला मिळत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  News18 Desk

तुषार कोहळे, प्रतिनिधी

नागपूर, 23 ऑगस्ट : नागपूर शहरामध्ये हळूहळू स्वाईन फ्लूचा विळखा घट्ट होतांना दिसत आहे. नागपूरमध्ये मागच्या 24 तासांत स्वाईन फ्लूच्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 20 ऑगस्टपर्यंत नागपूर शहरात एकूण 154 स्वाईन फ्लू रुग्ण होते त्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे साधारण 14 टक्के रुग्णांना रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर देण्याची गजर पडली आहे.

नागपुरात स्वाईन फ्लू वाढतोय...

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत नागपूरकरांनी अनुभवलेला थरार व त्याच्या वेदना अजूनही संपल्या नाही. तोच आता नागपूरमध्ये आणखी एक धोका स्वाइन फ्लूच्या रूपाने डोकं वर काढत आहे. मागच्या 24 तासांत 17 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 20 ऑगस्टपर्यंत नागपूर शहरात एकूण 154 स्वाईन फ्लू रुग्ण होते. त्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरांसोबत ग्रामीण भागामध्ये देखील स्वाईन फ्लूचे रुग्ण पाहायला मिळत आहे. नागपूरच्या ग्रामीण भागात 119 रुग्णाची नोंद झाली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. सोबतच धोकादायक श्रेणीतील नागरिकांना स्वाईन फ्लूचे लसीकरण दिले जात आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, सतर्क राहण्याची निश्चितच गरज असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

हेही वाचा - पायांवर दिसणाऱ्या या लक्षणांकडे कधीच करू नका दुर्लक्ष, असू शकतात डायबेटिसचे संकेत

काय आहेत स्वाईन फ्लूची लक्षणं - 

स्वाईन फ्लू झालेल्या व्यक्तींना थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब आणि कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणं दिसतात. त्यामुळे यापैकी कोणतंही लक्षण तुम्हाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वाईन फ्लू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं हा आजार पसरण्याची शक्यता आहे.

खोकला, शिंका, व्यक्तीच्या स्पर्शातून हा आजार पसरू शकतो. नाक, डोळे आणि कानावाटे याचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. डायबेटिस आणि हार्ट पेशंट असलेल्या लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोनासोबत पुन्हा एकदा स्वाईन फ्लू डोकं वर काढत आहे. आधीच व्हायरल ताप आणि साथीच्या आजारांमुळे टेन्शन वाढत असताना नागपुरात स्वाईन फ्लूचं थैमान पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

First published:

Tags: Corona, Nagpur News, Swine flu in india