नागपूर, 31 जानेवारी : केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावाचा वापर करून 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या करणाऱ्या एका आंतरराज्यीय रॅकेटचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटचा सूत्रधार मयंक कुमार उर्फ वंश अग्रवाल आणि कथित पत्रकार पियुष पुरोहित यांना पोलिसांनी अटक केली आहे. मयंकचे सहकारी संजय बघेल आणि संजीत बघेल यांनाही पोलिसांनी आरोपी केले आहे.
पियुष हा मध्य प्रदेशात साप्ताहिक आणि वेब पोर्टलचा प्रतिनिधी आहे. आरोपी मध्य प्रदेशातील एका कोळसा उद्योजकाला 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. या विरोधात व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
हे ही वाचा : 'वंचित महविकास आघाडीचा..' प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टचं सांगितलं, पवारांवर पुन्हा निशाणा
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी फसवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी थेट केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावावर तब्बल 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. खंडणी न दिल्यास बदनाम करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागपुरातील तीन तोतया पत्रकारांसह चौघांना अटक केली आहे.
पीयूष पुरोहित, राष्ट्रभान पोर्टलचा पत्रकार संजय बघेल, संजीत बघेल आणि वंश अग्रवाल ऊर्फ मयंक कुमार अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील कोळसा व्यापारी गुप्ता यांना गेल्या काही दिवसांपासून तोतया पत्रकार पीयूष पुरोहित, वंश अग्रवाल, मध्यप्रदेशातील शिवनी येथील राष्ट्रभान डॉट इन या पोर्टलचा संजय बघेल, संजीत बघेल हे चौघेही एक कोटी रुपयांची खंडणी मागत होते. पीयूष आणि बघेल हे दोघेही गुप्ता यांच्याविषयी बदनामीकारक बातम्या प्रकाशित करीत होते. त्यामुळे गुप्ता यांनी दिवानी न्यायालयात बघेल बंधूंना खेचले होते. न्यायालयाने दोघांनाही कोणतेही वृत्त प्रकाशित न करण्याच्या अटीवर सोडले होते.
या घटनाक्रमानंतर चौघांनी गुप्ता यांना खंडणी मागण्याचा नवा कट रचला. वंश अग्रवाल ऊर्फ मयंक कुमार याने गुप्ता यांना केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांचे विशेष कार्यासन अधिकारी (ओएसडी) यांच्या नावाने फोन केला. कोळसा व्यापारात काही बनावट कागदपत्र वापरल्याचा आरोप करीत एक कोटीची खंडणी मागितली. आरोपींनी गुप्ता यांच्या पुतण्याची भेट घेऊन 10 लाखांची मागणी केली.
हे ही वाचा : जलयुक्त शिवारच्या नावाने चांगभलं, लिपिकाने तब्बल 26 कोटींचा निधी केला गायब, 5 तहसीलदार गोत्यात
गुप्ता यांनी खंडणी देण्यास नकार देत थेट नागपूर सायबर पोलिसांत तक्रार केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी तपास करीत आरोपी तोतया पत्रकार पीयूष पुरोहित, संजय बघेल, संजीत बघेल आणि वंश अग्रवाल यांना अटक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur, Nagpur News