नागपूर, 18 डिसेंबर: शहरातील वर्धा रोडवरील चिचभुवनमधील नारायणा विद्यालयंम या शैक्षणिक संस्थेला शिक्षण विभागानं दणका दिला आहे. विद्यार्थ्यांकडून घेतलेले अतिरिक्त शुल्क सुमारे 7 कोटी 59 लाख पालकांना परत करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. महिनाभरात ही रक्कम पालकांना परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एखाद्या शाळेला अतिरिक्त शुल्कवसुली पोटी कोट्यवधींची रक्कम परत करण्याचे आदेश दिल्यानं शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. हेही वाचा… गिरीश महाजनांविरोधात गुन्हा, चाकुचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप राज्य मंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्याचबरोबर जागरूक पालकांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण संस्थेला जोरदार धक्का दिला आहे. नारायण विद्यालयानं 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षांच्या काळात विद्यार्थ्यांकडून सुमारे 7 कोटी 59 लाख 29 हजार रुपये अतिरिक्त शुल्क वसूल केलं होतं. यामुळे नागपूरसह राज्यातील इतर शैक्षणिक संस्थांचेही धाबे दणाणले आहेत. नियमापेक्षा जास्त शुल्क आकरलं… नारायणा विद्यालयानं सन 2017-28 ते 2019-20 या दोन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून नियमापेक्षा अधिक शुल्क वसूल केलं होतं. ते अतिरिक्त शुल्क विद्यार्थ्यांच्या पालकांना एक महिन्याच्या आत परत करावे. तसेच 2014-15 आणि 2016-17 मध्ये आकारण्यात आलेली शैक्षणिक शुल्काची रक्कम, सत्र शुल्काची रक्कम निश्चित करण्यासाठी पावले उचलण्यात येतील, असेही शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. काय आहे प्रकरण? नारायणा विद्यालयानं विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याप्रकरणी 26 नोव्हेंबर 2020 रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती. पालकांचे शिष्टमंडळानं याबाबत शिक्षण राज्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी, प्र.ल. आकनुरवार, कनिष्ठ लेखापरीक्षक प्रदीप वरघडे, वरिष्ठ लिपिक मनीष घरडे यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीनं प्रत्यक्ष नारायणा विद्यालयात जाऊन तपासणी केली असता सगळा प्रकार समोरआला. हेही वाचा… मणिपूरनंतर राजधानी दिल्लीत 4.2 रिश्टर स्केल तीव्र भूकंपाचा धक्का महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 2021 व महाराष्ट्र शैक्षणिक संस्था नियमावली 2016 मधील विविध कलमांचे आणि नियमांचे नारायणा विद्यालयानं उल्लंघन केल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर याबाबतचा अहवाल उपसंचालक कार्यालयाला देण्यात आला. त्या आधारावर शिक्षण उपसंचालकांनी कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.