नवी दिल्ली, 18 डिसेंबर : मणिपूरनंतर भूकंपाच्या धक्क्यानं राजधानी दिल्ली हादरली आहे. 4.2 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे. दिल्ली आणि NCRच्या काही भागात रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू गुरुग्रामच्या दक्षिण-पश्चिमेला 48 किलोमीटरवर असल्याचं सांगितलं जात आहे. गुरुवारी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. सद्यस्थितीत जीवित व मालमत्तेचं कोणतंही नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही.
या आधी 2 डिसेंबरला दिल्ली-NCRमध्ये हलक्या स्वरुपाचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. 2.7 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता त्यावेळी मोजण्यात आली होती. गाझियाबाद हा त्यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू होता. पहाटे 4 वाजताच्या सुमारास हे भूकंपाचा धक्का जाणवला होता. या वर्षी राजधानी दिल्लीमध्ये 15 हून अधिक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तर त्याचा केंद्रबिंदू दिल्लीपासून काही अंतरावर होता. त्यामुळे चिंता देखील व्यक्त केली जात आहे.
दिल्ली तसेच एनसीआरच्या काही भागात हलक्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा आणि गाझियाबादमध्ये भूकंपाचे धक्के लोकांना जाणवले.
गुरुवारी रात्री मणिपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. हे भूकंप चौरचंदपूर भागात आले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 मोजली गेली. यावेळीदेखील जीवित व मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. यानंतरही लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि ते त्यांच्या कार्यालये व घराबाहेर पडले.भूकंपाच्या धक्क्यानंतर अनेकांनी भीतीनं आपली घर सोडली आणि बाहेर आले. दिल्लीतील नागरिकांच्या मनात काहीसं भीतीचं वातावरण आहे. मात्र या भूकंपाच्या धक्क्यानंतर जीवितहानी अथवा मालमत्तेचं नुकसान झाल्याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.