मुंबई, 17 नोव्हेंबर : गेल्या 100 वर्षांमध्ये मुंबई शहर मोठ्या प्रमाणात बदललं. ब्रिटीशांच्या काळातील प्रमुख बेट ते महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, जगातील प्रमुख महानगर असा प्रवास मुंबईनं केला आहे. झपाट्यानं बदलणाऱ्या मुंबई शहरामध्ये काही वास्तू आजही जुन्या काळाची साक्ष देणाऱ्या आहेत. त्यापैकीत एक म्हणजे गिरगावातील ठाकूरद्वार नाक्यावरील सनशाईन रेस्टॉरंट आणि बेकरी. सुपरस्टार राजेश खन्नासह अनेक राजकारणी, सेलिब्रेटींपासून ते सामान्य गिरगावकरांपर्यंतचा हक्काचा अड्डा असलेलं सनशाईन 30 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे.
मुंबईमध्ये गेल्या शतकाच्या सुरूवातीला अनेक इराणी हॉटेल होते. विशेषत: दक्षिण मुंबईत याची संख्या मोठी होती. गेल्या काही वर्षांमध्ये यापैकी अनेक हॉटेल बंद पडले. पण, सनशाईन बेकरी ही त्याला अपवाद होती. अगदी खडतर अशा कोरोना कालखंडातही सनशाईन सुरू होते. गिरगावकरांचा अभिमान असलेली सनशाईन बंद होणार असल्याची बातमी समजताच अनेकांना धक्का बसला आहे.
काय आहे कारण?
सनशाईन बेकरी ठाकूरद्वार नाक्यावरील 120 वर्षे जुन्या इमारतीतच्या तळमजल्यावर आहे. या इमारतीचा राहण्यासाठी अत्यंत धोकादाय अशा सी 1 श्रेणीत समावेश आहे. या चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर सात व्यावसायिक दुकाने आहेत. राहण्यासाठी धोकादायक गटात असल्यानं इमारतीमधील सर्वांनाच जागा सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे.
देवानंदपासून नाना पाटेकरपर्यंत कलाकारांची पुण्यातील 'या' कॅफेला आहे पहिली पसंती
गिरगावातील शेवटचं इराणी हॉटेल
सनशाईन इराणी रेस्टॉरंट हे खीमा पाव, बन मस्का, ब्रूनमस्का , खारी बिस्किटांसाठी ओळखलं जातं. गोरगरीब, सामान्यांना परवडेल अशी ही बेकरी आहे. त्याचबरोबर सेलिब्रेटी, राजकारणीही इथं नियमित हजेरी लावत. सुपरस्टार राजेश खन्नाचा हा ऐकेकाळचा नियमित कट्टा होता. अभिनेते प्रदीप पटवर्धन, माजी मंत्री प्रमोद नवलकरही इथं नियमित येत असतं. शिवसेना खासदार अरविंद सावंत देखील या बेकरीमध्ये येतात.
30 नोव्हेंबर रोजी सनशाईनचा अस्त होईल. ‘खिमापाव’, ऑम्लेट पाव आणि स्पेशल चहा घेण्यासाठी नियमितपणे येणारे गिरगावकर ही बातमी ऐकून अस्वस्थ आहेत. आपल्या हक्काची जागा गेली, अशी भावना ते व्यक्त करत आहेत.
Video : भंगारपासून नवं विश्व बनवणारा अफलातून मुंबईकर, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!
'या इराणी बेकरीत सर्व वस्तू जुन्या पद्धतीच्या वेगळ्या बेकरीत बेक केल्या जातात. आता माझ्यासह बेकरीचे 20-25 कामगार पुढील आठवड्यात बेरोजगार होतील. आम्हाला दुसरीकडेसुद्धा जागा देण्यात आलेली नाही. हा तळमजला बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये आहे. वरच्या भागातच इमारत जीर्ण झालीय. त्यामुळे वरचा भाग पाडून नवा बांधावा,' असं मत सनशाईनचे व्यवस्थापक अशोक शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.