मुंबई, 1 सप्टेंबर : आनंद, उत्साह आणि जल्लोषाचं प्रतिक असलेला सण म्हणजे गणेशोत्सव. या उत्साहाला गेली दोन वर्ष कोरोनामुळे ब्रेक लागला होता. यावर्षी कोणत्याही बंधनाशिवाय मुंबईतील साजरा होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. त्याचबरोबर गणेश मंडळांनीही भव्य देखावे तयार केले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचं वाजत-गाजत आगमन झाले. मुंबईतील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध (Ganeshotsav in Mumbai) आहे. मुंबईतील प्रसिद्ध देखावे पाहण्यासाठी भाविक ही दहा दिवस शहरात मोठी गर्दी करत असतात. यावर्षी पाहायलाच हवेत असे मुंबईतील 10 प्रमुख देखावे (Top 10 Ganesh Pandals in Mumbai) कोणते ते पाहूया लालबागचा राजा
मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख आहे. गणेशोत्सवातील सर्व दिवस या राजाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी असते. यंदा लालबागच्या राजाने अयोध्येतील राम मंदिराचा देखावा यंदा लालबागच्या राजा मंडळानं साकारला आहे. अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे सेट उभारणारे कला दिग्दर्शक नितिन देसाई यांनी हा देखावा उभारला आहे. गणेशगल्ली
लालबागच्या राजापासून जवळच मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्लीमध्ये मुंबईचा राजा गणपती आहे. आपल्या खास आणि वैशिष्ट्यपूर्ण देखाव्यांसाठी हे मंडळ ओळखले जाते. हे मुंबईतील जुन्या सार्वजनिक गणेश मंडळांपैकी एक आहे. या मंडळाची स्थापना 1928 साली गिरणी कामगारांनी केली होती. वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंडळाचा देखावा यंदा त्यांनी साकारला आहे. तेजुकाया सार्वजनिक गणेशमंडळ
मुंबईतील लालबागचा आणखी एक प्रसिद्ध गणपती. या मंडळाच्या मूर्ती नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण असतात. यंदा या मंडळानं 22 फुट उंच गणेशमुर्ती साकारली आहे. विष्णूरूपी ही मूर्ती आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मूर्ती इकोफ्रेंडली असून शाडूची माती आणि कागदी लगद्यापासून ही मूर्ती बनवण्यात आली आहे. या मंडळाचं यंदा 56 वे वर्ष आहे. पाणी वाचवा आणि झाडे जगवा असा संदेश या मंडळाने देखाव्यातून दिला आहे. नाशिककरांनी पाहिलेच पाहिजेत असे टॉप गणपती, प्रत्येक बाप्पा आहे खास GSB सेवा गणेश मंडळ
मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेशमंडळ म्हणून किंग्ज सर्कलच्या GSB सेवा मंडळाची ओळख आहे. या मंडळाच्या गणेशमूर्तीमध्ये 68 किलो सोने आणि 327 किलो चांदीचा वापर करण्यात आलाय. शिस्तप्रिय गणेश मंडळ अशीही या मंडळाची ओळख आहे. या मंडळाने गणेशोत्सवासाठी तब्बल 300 कोटींचा विमा उतरवला आहे. खेतवाडीच्या गणराज
गिरगावतील प्रसिद्ध गणपती मंडळाचे यंदा 66 वे वर्ष आहे. राजस्थानमधील राजमहलाचा देखावा या मंडळानं साकारला आहे. मुंबईचा महाराजा
खेतवाडी ११वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 61 वे वर्ष आहे. परशुरामांच्या रूपातील 38 फुटांची गणपती बाप्पाची मुर्ती यंदा साकारण्यात आली आहे. परशुरामांच्या गुरुकुल आश्रमाचा देखावा मंडळाने साकारला आहे. भाविकांनी श्री चरणी हार, फुलं, प्रसाद न देता शालेय वस्तू मंडळाला भेट द्याव्या. या सर्व वस्तू पालघरच्या आदिवासी पाड्यातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वाटप करणार असल्याचं मंडळानं जाहीर केलं आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी
चिंचपोकळी पुलाखालील चिंतामणी गणेश मंडळाच्या आगमनाची मिरवणूक दणदणीत असते. या राजाच्या दर्शनालाही पहिल्या दिवसापासून गर्दी होते. कोरोनानंतर दोन वर्षांनी या मंडळाची भव्य अशी मूर्ती साकारण्यात आली आहे. मुंबईतील जुन्या मंडळांमध्ये याचा समावेश होतो. या मंडळाची स्थापना 1920 साली झाली. Ganeshotsav 2022 : यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील ‘हे’ 10 गणपती नक्की पाहा
अंधेरीचा राजा
मुंबईतील पश्चिम उपनगरामधील प्रसिद्ध अंधेरीच्या राजा मंडळाचं यंदा 57 वे वर्ष आहे. बडोद्याच्या प्रसिद्ध लक्ष्मी विलास पॅलेसचा देखावा या मंडळाने साकारला आहे. बडोद्याचे लक्ष्मी विलास पॅलेस लंडनमधील बर्मिंगहॅम पॅलेसच्या चौपट आहे, असे सांगण्यात येते. या पॅलेसचा देखावा मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. नवसाला पावणारा हा बाप्पा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. ( फोटो - मुंबईचा अंधेरीचा राजा इन्स्टाग्राम) परळचा राजा
परळ विभाग सार्वजनिक गणेश मंडळ म्हणजेच परळचा राजानं यंदा गणपतीचा गजलक्ष्मी अवतार साकारलाय. यंदा या मंडळाच्या बाप्पाची मूर्ती 24 फुट उंच आहे. 1947 साली स्थापन झालेल्या मंडळाचे हे 76 वे वर्ष आहे. फोर्टचा महाराजा
फोर्टच्या महाराजाचे यंदा 45 वे वर्ष आहे. 15 फुट उंचीची बाप्पाची मुर्ती या मंडळाने साकारली असून या मुर्तीच्या दोन्ही बाजूला सिंह आहेत. या गणपती बाप्पाच्या आगमनालाही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.