मुंबई, 22 ऑगस्ट : शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या अनेक कामांना स्थगिती देण्यात आली, तर अनेक निर्णय देखील बदलण्यात आले. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडीतील मित्रपक्ष आम्हाला निधी देत नसल्याचा आरोप केला होता. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला मारला आहे. तसेच आघाडी सरकारने पाडलेला चुकीचा पायंडा आम्ही चालवणार नसल्याचेही सांगितले आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? आधीच्या महाविकास आघाडीतील सरकारने विरोधकांना निधी दिला नाही. मात्र, विरोधीपक्षातील आमदारांना आम्ही निधी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मागच्या सरकारने जवळपास 124 आमदारांना निधी दिला नसल्याचा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला. ते म्हणाले, की आघाडी सरकारने चुकीचा पायंडा पाडला. मात्र, आम्ही असं करणार नाही. नियोजन विभागाच्या 580 कोटी रूपयांच्या पुरवण्या मागण्या पटलावर मांडल्या असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधताच करुणा शर्मा विधिमंडळात, एकनाथ शिंदेंची घेणार भेट!
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची शिंदे सरकारवर घणाघाती टीका शिंदे सरकारने 25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत 4.71 टक्के एवढे हे प्रमाण आहे. आठ विभागांवर सभागृहात चर्चा ठेवण्यात आली आहे. या आठ खात्यांसाठी 10 हजार कोटींची तरतूद आहे. पण उर्वरीत ज्या खात्यांवर 15 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, त्या खात्यांविषयी सभागृहात चर्चा न करताच त्याला मंजुरी दिली जाणे चुकीचे असल्याबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. मराठवाडा विकासासाठी पॅकेज मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 ला स्वतंत्र झाला. मराठवाडा यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करत आहे त्यामुळे मराठवाड्याच्या विकासासाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशी मागणीही विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली.