मुंबई, 12 मार्च : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत स्टिंग ऑपरेशन (sting operation) असलेले पेन ड्राईव्ह सादर केले आणि कशाप्रकारे विरोधी पक्षाच्या नेत्यांना विनाकारण एखाद्या प्रकारात अडकवण्याचा कट रचला जात आहे त्याचे पुरावे दिले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या आरोपांनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) जसे वकील आहेत तसा मी सुद्धा एक वकील आहे. मला हे माहिती होतं की, हे काय -काय डिफेन्स घेणार आहेत. त्याची मी आधीच काळजी घेतली आहे. त्याची सर्व टेक्निकल माहिती माझ्याकडे आहे. त्याचं एक फॉरेन्सिक ऑडिट मी करुन घेतलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे या सव्वाशे तासाच्या व्यतिरिक्त आणखी पुरावे माझ्याकडे आहेत. ही केस सीबीआयकडे गेल्यावर ते पुरावे मी देईन. याचा राज्य पोलीस कुठल्याही प्रकारे चौकशी करु शकत नाहीत. (Devendra Fadnavis said I have more evidence apart from 125 hours sting operation) वाचा : मुंबई पोलिसांची देवेंद्र फडणवीसांना नोटीस, नेमकं काय घडलं? वाचा प्रवीण चव्हाण आज बोलले. तीन दिवसांनंतर का बोलले? याचं कारण गेल्या दोन दिवसांत राज्य सरकार आणि राज्य पोलिसांसोबत समन्वय साधून यापुढे काय करायचं या संदर्भातील निर्णय करुन ते बोलले आहेत. मला याची पूर्ण कल्पना आहे की, ते प्रयत्न करतील की या ठिकाणीच एखादा गुन्हा दाखल करुन सर्व मिटवायचं. पण मी ते होऊ देणार नाही. मी त्या संदर्भात एक्सपर्टसोबत चर्चा करुन सर्व माझ्याकडे ठेवलं आहे. ज्या-ज्या टप्प्यावर ज्या-ज्या गोष्टीची आवश्यकता असेल त्या-त्या टप्प्यावर ती-ती गोष्टी, ती-ती टेक्निकल माहिती, फॉरेन्सिक रिपोर्ट मी सादर करेल. सरकारने ही केस सीबीआयला दिली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ आणि कोर्टातून सर्व माहिती सीबीआयला सादर करु असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. वाचा : देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब; घडाळ्यात छुपा कॅमेरा कोणी लावला? स्टिंग ऑपरेशन कोणी केलं? प्रवीण चव्हाण म्हणाले…. नेमका काय आहे देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब? महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, याचा संपूर्ण लेखाजोखाच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सादर केला. हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना असल्याचे आणि सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह केला. 125 तासांचे स्टिंग ऑपरेशन अन् 29 पेन ड्राईव्ह सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केला. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटे कुंभाड रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात आहे. शिवाय, पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून पुरते स्पष्ट होते आहे. या प्रकरणातील संपूर्ण एफआयआर या वकिलांनीच तयार करून दिला असून, रेडच्या वेळी संपूर्ण बारकाईने नियोजन त्यांनीच केलेले आहे. ड्रग्जच्या व्यापाराचा उल्लेख करून मोक्का लावायला कसा सांगितले, त्यातून शासन पातळीवर कशा बैठका झाल्या, त्यात मुख्यमंत्र्यांपासून ते पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक कसे उपस्थित होते, याचा संपूर्ण उलगडा या वकिलांनी केला आहे. प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे पॉझिटिव्ह केले, याची संपूर्ण कथा ते यातून सांगताना दिसत आहेत. वाचा : देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब फुसका बार? राष्ट्रवादी काँग्रेसने खुलासा करत केला मोठा दावा पवारांवर गंभीर आरोप पवार साहेबांना कसे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या इतर नेत्यांना संपवायचे आहे, त्यासाठी कोणते निर्देश त्यांना प्राप्त झाले आहेत, हे सर्व करण्यासाठी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी संजय पांडे यांना कसे बसविण्यात आले. त्यासाठी त्यांनी कशी कबुली दिली, याचे संपूर्ण तपशील त्यांनी विस्तृतपणे सांगितले आहेत. मीडियाला कोणत्या बातम्या लीक करायच्या? मीडियाला कोणत्या बातम्या लीक करायच्या, आधीच ठेवलेल्या पुराव्यांचे चित्रीकरण कसे करायला लावायचे, याचेही तपशील त्यात आहेत. पुरावे प्लांट करताना कुठेही कॅमेरे नाहीत, यासाठी आधीच रेकी कशी करण्यात आली, याचीही कबुली ते देत आहेत. अनिल गोटे यांचा या वकिलांशी प्रत्यक्ष संवादही आहेत, फोन कॉल्स आहेत, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या भेटी-बैठकी याचे इत्यंभूत तपशील त्यात आहेत. साहेब कसे कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत आणि उगाच पोलिस स्टेशन डायरीत नोंद नको, म्हणून पडद्याआडून काय-काय निर्देश देतात, याची संपूर्ण कथा त्यांनी सांगितली आहे. भाजपचे हे नेते होते टार्गेट? देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेते कसे टार्गेटवर आहेत आणि त्यांना कसे-कसे संपविण्यात येणार आहे, त्यातून कुणाचे काय लाभ होणार आहेत, याचेही तपशील यात आहेत. अनिल देशमुख यांनी केवळ बदल्यांमध्ये नाही, तर इतरही स्त्रोतांतून कसे पैसे कमाविले, छगन भुजबळ यांना पैसे घेऊन कसे सोडण्यात आले, मुंबईची कोण वकिल आहे, जी जसेजला मॅनेज करते, याचेही तपशील यात आहेत. देवेंद्र फडणवीसांना फसवण्यासाठी कट? संजय राऊत यांची भेट घेऊन काय नियोजन करायचे, पुढच्या काळात कोणत्या ठिकाणी, कोणते गुन्हे दाखल करण्यात येणार, नवाब मलिक यांनी काय जबानी द्यायची, त्यातून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना कसे फसविता येईल, रश्मी शुक्ला प्रकरणात काय ओपीनियन द्यायचे, राजकीय नेत्यांनी त्यांना दिलेली मोकळीक अशी सर्व माहिती आहे आणि सोबतच जयंत पाटील यांच्याशी साधलेला संवाद सुद्धा आहे. एकूणच अतिशय स्फोटक अशा या स्टिंग ऑपरेशनमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यातील तपशील आज देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अध्यक्षांना सादर केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.