मुंबई, 14 नोव्हेंबर : आपलं बाळ गुणी व्हावं त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. मुलांच्या प्रगतीसाठी सर्व पालक सतत धडपडत असतात. आज 14 नोव्हेंबर म्हणजेच बालदिन आहे. त्यानिमित्ताने लेकीवर संस्कार व्हावे यासाठी धडपडणाऱ्या बाबाची गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विनोद गायकर हे अभिनेता, लेखक आहेत. त्यांनी वेणू या त्यांच्या मुलीसाठी गोष्टी लिहिण्याचे ठरवले. गायकर यांनी एक नाही, दोन नाही तब्बल 100 गोष्टी लिहिल्या आहेत. गोष्टी लिहाव्या असं का वाटलं? विनोद यांनी या 100 गोष्टींचा कथासंग्रह तयार केला असून त्याला ‘वेणूच्या गोष्टी’ असं नाव दिलं आहे. वेणू 4 वर्षांची असतानाच त्यांना ही कल्पना सुचली. मुलीवर चांगले संस्कार व्हावे, तिला सायफाय युगाविषयी लवकर कळावं आणि तिच्या विचारांना आकार मिळावा यासाठी गोष्टी लिहाव्यात असं त्यांनी ठरवलं. वेणूच्या पाचव्या वाढदिवशी या सर्व गोष्टी एकत्र करुन तिला गिफ्ट देण्याचा त्यांचा निश्चय होता. ‘वेणूची गोष्ट’ या कथा संग्रहाचे 4 भाग आहेत. विनोद यांनी मुलीसाठी एकूण 170 विषय निश्चित केले होते. त्यानंतर गोष्टी लिहायला सुरूवात केली. यातील काही विषय एकत्र केले तर काहींवर स्वतंत्र गोष्टी लिहिल्या. या गोष्टींमध्ये विज्ञानयुगाची, तंत्रज्ञानाची ओळख ते अनाथ मुलांची माई सिंधुताई या सर्वांच्या कार्याची ओळख रेणूला करुन देण्यात आली आहे. Childrens Day Speech: बालदिनानिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची ओळख ‘रॉकेटवाले आजोबा’ अशी या संग्रहात करुन देण्यात आली आहे. मुलांना चांगली शिकवण मिळावी यासाठी ‘हलक्या कानाचा’ अशी गोष्ट या संग्रहात आहे. जीवनसत्वं तसंच आपण जे पदार्थ खातो त्याचं महत्त्व कळावं यासाठी ‘गाढवाला गुळाची चव काय?’ ही खास गोष्ट आधुनिकतेचा टच देऊन या कथासंग्रहात वाचायला मिळते. लहान मुलीला समजतील अशा स्वरुपात विनोद यांनी या गोष्टी लिहिल्या आहेत. शाळेत वेणूचीच चर्चा इयत्ता पहिलीत शिकणारी वेणू बाबांनी लिहिलेल्या गोष्टी साभिनय शाळेत मित्र मैत्रिणींसमोर सादर करते. तिच्या गोष्टी सांगण्याच्या कौशल्यामुळे शाळेत सगळेच तिचं कौतुक करतात. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी तर चक्क वेणूला तर मॉनिटर बनवलंय. वेणूचे मित्र मैत्रिणी तिला रिकाम्या वेळेत, मधल्या सुट्टीत तिला गोष्टी ऐकवायला आग्रह करतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची क्रेझ वाढलेली असूनही विनोद यांनी मुलीला मराठी शाळेत घातलं आहे. मातृभाषेचं योग्य शिक्षण मिळावं आणि तिच्यावर चांगले संस्कार व्हावे हा त्यांचा उद्देश आहे. वेणूही बाबांनी लिहिलेल्या गोष्टींची ती मुद्देसूद मांडणी करते. त्यातून मिळालेलं ज्ञान आणि त्याचा सारांशही सांगते. बालदिनाचा आनंद करा द्विगुणित, चिमुकल्यांसह सर्वांना द्या अशा गोड शुभेच्छा ‘आपण आजपर्यंत प्रामाणिक लाकुडतोडा, कोल्ह्याला द्राक्षं आंबट या प्रकारच्या गोष्टी ऐकत आलो आहोत. आता जग बदललं. बालसाहित्यामध्येही त्यानुसार बदल होणे आवश्यक आहे. आजची मुलं टेक्नोसॅवी आहेत. त्यांना चित्र आकर्षित करतात. त्यांना समजतील अशा पद्धतीनं या गोष्टी मांडणं आवश्यक होतं. हा कथा संग्रह मी फक्त वेणूलाच गिफ्ट म्हणून देणार होतो. पण, अनेकांचा आग्रह आणि प्रोत्साहनामुळे ‘वेणूच्या गोष्टी’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे,’ असं विनोद यांनी सांगितलं. ‘वेणूच्या गोष्टी’ हे पुस्तक घेण्यासाठी संपर्क क्रमांक - 9821861699, 9879053665
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.