मुंबई, 17 ऑक्टोबर : दिवसभराच्या धावपळीत, लोकलच्या प्रवासात, ऑफिसच्या ब्रेकमध्ये कुठेही आपल्याला भूक लागली की डोळ्यासमोर उभा राहणारा पदार्थ म्हणजे वडापाव. अस्सल मुंबई चा पदार्थ असलेला हा वडापाव आता जगभर लोकप्रिय आहे. महागाईनुसार हा वडापाव कुठं 15 तर कुठे 20 रुपयांना विकला जातो. पण, मुंबईतील एक असं ठिकाण आहे जिथं हा शालेय विद्यार्थ्यांना फक्त 5 रुपयांमध्ये वडापाव दिला जातो. हे वाचून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. पण, याचं संपूर्ण कारण समजल्यावर वडापाव चालवणाऱ्या काकांचा तुम्हाला नक्की अभिमान वाटेल. कुठे मिळतो ‘हा’ वडापाव? सायन सर्कलमध्ये 2009 पासून अरविंद गुप्ता वडापावची विक्री करतात. त्यांच्या स्टॉलवर वडापाव आणि सामोसा हे दोनच पदार्थ मिळतात. सुरुवातीला त्यांचे शाळा-कॉलेजमध्ये कँटीन होते. त्यामध्ये त्यांचे नुकसान झाले. 6 महिने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली. त्यानंतर त्यांनी वडापावची विक्री सुरू केली. आता त्यांची मुलंही या व्यवसायात त्यांची मदत करतात. या स्टॉलचं वैशिष्ट्य म्हणजे इथं शालेय विद्यार्थ्यांना 5 रुपये, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 10 रुपये तर अन्य सर्वांना 12 रुपयात वडापाव मिळतो. कारण वाचून वाटेल अभिमान! शाळेच्या गणवेशात मुलं आली की त्यांना 5 रुपयांत वडापाव मिळतो. ‘या मुलांना थोडासाच पॉकेटमनी मिळतो त्यात ते इतर काहीही खाऊ शकत नाही त्यामुळे गणवेशात येणाऱ्या प्रत्येक मुलाला 5 रुपयांत वडापाव आम्ही देतो. इतक्या कमी किंमतीमध्ये वडापाव देणं परवडत तर नाही पण मी आणि माझ्या मुलांनी गरिबी अनुभवली आहे. आम्ही मीठ, चपातीवर दिवस काढले आहेत. त्या काळात माझ्या मुलांना वडापाव खायचा असला तर 1 वडा आणि दोन पाव करून वड्याचा लहान तुकडा पावला लावून द्यायचो. मुलांना वडापाव देण्यात मला आनंद वाटतो,’ असा भावुक अनुभव या वडापाव चालवणाऱ्या काकांनी सांगितला आहे. मुंबईत मिळतो हवेत उडणारा ‘रजनीकांत स्टाईल’ डोसा, पाहा Video अरविंद गुप्ता यांची ओळख आता ‘वडापाववाले काका’ अशी झाली आहे. शाळा सुटली की काकांच्या स्टॉलभोवती त्यांचा किलबिलाट सुरू होता. अनेक विद्यार्थी इथं वडापाव खाण्यासाठी गर्दी करतात. हळूहळू या संपूर्ण परिसरातील प्रत्येक मुलगा वडापाव खाताना दिसतो. आम्ही रोज वडापाव खातो. कधीकधी तर डब्बा न आणता वडापाव खाऊनच घरी जातो. हाच वडापाव मुंबईतला बेस्ट आहे. असं ही मुलं म्हणतात. प्रत्येक दिवशी ताजं तेल वापरून वडापाव, सामोसा तळला जातो. दुपारी 2 वाजता हे काका आपला ठेला लावतात रात्री 10 वाजेपर्यंत येथे ग्राहकांची गर्दी असते. महागाईच्या या युगात आपल्यावर आलेली वेळ इतरांवर येऊ नये. त्यामुळे पदरमोड करुन हे काका शालेय विद्यार्थ्यांना 5 रुपयांमध्ये वडापाव देतात. त्यांच्या या चांगुलपणाचे मिश्रण वड्यात होते. त्यामुळेच कदाचित हा संपूर्ण मुंबईतील टेस्टी वडापाव आहे, अशी भावना ग्राहकांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील कॅफेमध्ये पदार्थांची नाही तर वेळेची मोजावी लागते किंमत! पाहा Video
गुगल मॅपवरून साभार
वडापाव स्टॉलचा पत्ता सायन सर्कल, भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ.