सिंधुदुर्ग, 31 जुलै : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी नेत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहे. तर दुसरीकडे भाजप नेते ही कारवाई योग्य असल्याचं सांगत आहे. दरम्यान शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, ईडी अटक करणार असल्याचं संजय राऊतांना आधीच कल्पना होती. त्या संदर्भात त्यांचं आपल्याशी बोलणं झालं होतं आणि त्यांची मानसिक तयारीही होती. भाजपने राऊतांना शरण येण्यास सांगितलं होतं. तुम्हाला जेल हवंय की, भाजप असे दोन पर्याय त्यांच्या पुढे ठेवले होते. मात्र त्यांनी ताठ मानेने शिवसेनेचा बाणा दाखवून आम्ही जेलमध्ये जाण्यास तयार आहोत. मात्र भाजप समोर झुकणार नाही असं सांगितल असल्याचा गौप्यस्फोट आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. ईडीच्या कारवाईवर संजय राऊत काय म्हणाले? सकाळपासून सुरू असलेल्या चौकशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. राऊत यांना ईडी कार्यालयात नेलं जात आहे. यादरम्यान, राऊत यांनी न्यूज 18 शी संवाद साधला. काहीही केलं तरी मी हार मानणार नाही, मी लढा देत राहीन, अस संजय राऊत बोलताना म्हणाले. यावेळी राजकीय सूडापोटी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेला त्रास देण्यासाठी, महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी, हे सर्व दमनचक्र सुरू आहे. पण मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.