मुंबई, 31 जुलै : शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. ईडी अधिकारी आज सकाळपासून संजय राऊतांच्या भांडूप येथील मैत्री या निवासस्थानी दाखल झाले होते. ईडी अधिकाऱ्यांकडून संजय राऊतांची कसून चौकशी सुरु होती. तसेच कुटुंबियांची चौकशी केली गेली. यावेळी संपूर्ण बंगल्याची झडती घेण्यात आली. दरम्यान संजय राऊत यांच्या घरातून 11.50 लाखांची कॅश सापडली आहे. ED ने छापेमारीदरम्यान ही कॅश जप्त केली आहे. या प्रकरणात ईडी संजय राऊत यांना प्रश्न विचारणार असल्याचं समोर आलं आहे. इतकी कॅश घरात का ठेवण्यात आली, याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. याशिवाय त्यांना काही कागदपत्रंही सापडली आहे.
ईडीच्या कारवाईनंतर मैत्री बंगला सोडतानाचा संजय राऊतांचा Exclusive Video pic.twitter.com/MZkY33KrTv
— News18Lokmat (@News18lokmat) July 31, 2022
राऊतांच्या मैत्री बंगल्यात सकाळपासून काय-काय घडलं? सुनील राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी अधिकाऱ्यांनी आज संजय राऊत यांच्या संपूर्ण घराची झडती घेतली. घरात असलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आणि काही कागदपत्रे सोबत नेले. विशेष म्हणजे ईडीचं एक पथक राऊतांच्या मुलीला घेवून त्यांच्या दादर येथील निवावस्थानी गेलं. तिथेदेखील अनेक तास अधिकाऱ्यांकडून झडती घेण्याचं काम सुरु होतं. पण ईडी अधिकाऱ्यांनी सोबत नेलेले कागदपत्रे हे काहीच कामाचे नाहीत. ईडी अधिकाऱ्यांना पत्राचाळ संबंधित कोणतेही कागदपत्रे आणि पुरावे मिळाले नाही, अशी माहिती सुनील राऊतांनी दिली.