मुंबई, 23 ऑक्टोबर : ‘पोलिसांच्या बदल्यांवरून मुख्यमंत्री शिंदे रुसले आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस स्वतंत्रपणे कामे करीत आहेत. एकमेकांवर रोज चिखलफेक करणारे राजकारणी क्रिकेटच्या मैदानात स्नेहभोजनासाठी एकत्र येतात, पण राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांची गावे विकायला काढली. आपल्या राज्यपालांना हे माहीत आहे काय? असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात अस्मानी संकट आल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. याच मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून राज्यपालांवर आणि शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोलीस खात्याच्या बदल्यांवरून नाराज झाले व सातारा येथील आपल्या गावी निघून गेल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले. ते तितकेसे खरे वाटत नाही. मुख्यमंत्री शिंदे नाराज झाले असले तरी फडणवीस यांना ठोकरून, थोडे रुसून गावी जाऊन बसतील अशी स्थिती नाही. कारण भारतीय जनता पक्षाच्या मेहेरबानीवर त्यांचे मुख्यमंत्रिपद टिकून आहे आणि शिंदे यांचे राजकीय अस्तित्व त्या मुख्यमंत्रीपदावरच टिकून आहे. त्यामुळे भाजप शिंदे यांना गुदगुल्या करीत मारेल. भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते ‘सह्याद्री’वर भेटले. ते हसत हसत म्हणाले, “सरकार शिंदे गटाचे चाळीस आमदार चालवीत आहेत व मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर त्यांचाच ताबा आहे. आमदारांच्या हट्टापुढे आपले मुख्यमंत्री हतबल आहेत. इतर आमदारांची कामे होत नाहीत. सहन करण्याचा प्रश्नच नाही. शिंदे सरकारची स्थिती ओल्या बाळंतिणीसारखी आहे. थोडा वेळ देऊ त्यांना. बाकी पुढे पाहू?’’ असा दावाच सेनेनं केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. भारतीय जनता पक्षाने शिंदे व त्यांच्या काही लोकांना ‘ईडी’ वगैरेच्या फासातून तूर्त वाचवले, पण या सगळ्यांना कायमचे गुलाम करून ठेवले. सरकारचे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस घेतात व मुख्यमंत्री शिंदे ते निर्णय जाहीर करतात. आता दिल्लीसही फडणवीस एकनाथ शिंदेंशिवाय जातात, असा टोलाही सेनेनं लगावला. ‘मुख्यमंत्रिपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, “शिंदे यांचा रामदास आठवले होईल.’’ हे विधान बोलके आहे’ असा दावाच शिवसेनेनं केला आहे. ( ‘…म्हणून भोसरी भूखंड प्रकरणाची पुन्हा सुनावणी’, एकनाथ खडसेंचा भाजपवर निशाणा ) तसंच, एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. भाजपचे नेते सरळ सांगतात, “शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्या वेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील.’’ असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले? मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नाही. देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत गेले व मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेकडून महाराष्ट्र सरकारला हव्या असलेल्या जागेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी घेऊन आले. धारावीच्या पुनर्विकासाचे संपूर्ण श्रेय त्यामुळे फडणवीस व भाजपकडे जाईल. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या घोषणेत राज्याचे मुख्यमंत्री कुठेच नाहीत’ अशी टीकाही सेनेनं केली. (काल अमित शहांना शुभेच्छा, आज उद्धव ठाकरेंसोबत नार्वेकर असणार दौऱ्यावर, नाराजीची चर्चा गेली वाहून!) ‘महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या कुठे भूमिगत झाले आहेत याबाबत कोणी खुलासा करेल काय? मुळात आपले राज्यपाल राजभवनात आहेत की नाहीत, ते गृहमंत्री फडणवीस यांनी जनतेसमोर आणावे. ‘ठाकरे’ सरकारच्या काळात सध्याच्या राज्यपाल महोदयांची काम करून दमछाक होत होती. पूरस्थितीत स्वतंत्र दौरे काढून प्रशासनास वेगळ्या सूचना देत होते. इतर अनेक प्रशासकीय कामांत त्यांचा थेट हस्तक्षेप होता. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्यांचे मन साफ नव्हते व मंत्र्यांना राजभवनावर बोलवून ते सल्ले व सूचना देत होते. महाराष्ट्रातील महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, विद्यापीठांचा कारभार याबाबत ते कमालीचे जागरूक होते. शिवाजी महाराजांपासून सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत वादग्रस्त विधान करून ते खळबळ माजवीत होते. ते आपले कार्यक्षम राज्यपाल आज कोठे आहेत? सत्य असे आहे की, राजभवनाने आता लुडबुड करू नये, निवृत्तीबुवांसारखे राहावे हा राजकीय आदेश राज्यपाल महोदय पाळीत आहेत.? असं म्हणत सेनेनं राज्यपालांना सणसणीत टोला लगावला.