मुंबई, 09 ऑगस्ट : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार . (Maharashtra Cabinet Expansion) अखेर 38 दिवसानंतर होत आहे. मंत्रिमंडळामध्ये कुणा-कुणाला संधी मिळणार याची चर्चा रंगली आहे. पण, शिंदे गटातील 12 आमदार नाराज असून ते आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर भाजपसोबत घरोबा करून सरकार स्थापन केलं. अखेर आज महिना उलटल्यानंतर अखेरीस विस्ताराचा निर्णय घेतला आहे. पण, हे एकनाथ शिंदे यांचे हे मंत्रिमंडळ केवळ औट घटकेचं आहे, अनेक जण मंत्रिमंडळात इच्छुक आहे, त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा राऊत यांनी केला. आपल्याला मंत्रिमंडळात जागा मिळावी यासाठी अब्दुल सत्तार आणि इतर आमदार जोरदार प्रयत्न करत आहे. त्यांना जर मंत्रिपद मिळाले नाहीतर ते शिंदे गटात गोंधळ घालतील. शिंदेंच्या गटात एकूण 12 आमदार हे अस्वस्थ आहेत, ते सर्वजण आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही राऊत यांनी केला. ( कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराची धास्ती पाणी पातळी तब्बल 13 फुटांनी वाढ ) दरम्यान, आज मंगळवारी सकाळी 11 वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपकडून 9 जणांना फोन करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रकांतदादा पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावीत यांना आतापर्यंत फोन गेला आहे. भाजपच्या या 9 जणांशिवाय शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत आणि संजय शिरसाट यांना निरोप देण्यात आलेला आहे. उर्वरीत आमदारांनी कोर्टाच्या निकालानंतर शपथ दिली जाणार असल्याची शक्यता आहे. तर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतरचं हे पहिलंच मोठं अधिवेशन असणार आहे, त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार हे मात्र निश्चित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







