मुंबई, 25 नोव्हेंबर : युवा सेना नेते आदित्य ठाकरे आणि मनसे पुन्हा एकदा मैदानात आले आहेत. वरळीच्या रणांगणात 2019 साली मनसेने आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिला, त्या पाठिंब्याच्या मदतीने आदित्य ठाकरे निवडून आले, पण आता मात्र मनसे आणि आदित्य ठाकरे यांच्यात सामना रंगणार आहे, यासाठी मनसेनं त्यांचं हत्यार उपसलं आहे. वरळीतल्या कामांसंदर्भात मनसेने शड्डू ठोकला आहे.
वरळी मतदारसंघातल्या आदित्य ठाकरेंच्या कामाची मनसेने लाव रे तो व्हिडिओ म्हणत पोलखोल केली आहे. आदित्य ठाकरेंनी वरळीच्या त्यांच्या मतदारांसाठी भावनिक पत्र लिहिलं. या पत्रावर मनसेने टीका केली आहे. राज ठाकरेंमुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला.
'काका वगैरे सगळ्यांच्या आशिर्वादाने आणि वरळीकरांच्या आशिर्वादाने युवराज आमदार म्हणून निवडून आले. शिवसेनेकडे नेहमी एक ब्रम्हास्त्र असतं, तसंच एक भावनिक ब्रम्हास्त्र त्यांनी बाहेर काढलं आहे,' अशी टीका मनसेचे नेते संतोष धुरी यांनी केली आहे.
वरळीमध्ये नवीन बस थांबे, चांगले फूटपाथ, मजबूत रस्ते, हिरव्या गार मोकळ्या जागा उपलब्ध करून दिल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी वरळीकरांना लिहिलेल्या पत्रात केला. आदित्य ठाकरेंच्या त्या दाव्यावर मनसेने पलटवार केला आहे.
मनसेने आदर्शनगर कोळीवाड्यातील अरुंद रस्ते आणि फूटपाथची दुरवस्था लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून उघड केली आहे. मनसेच्या या आरोपांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने खंडन केलं आहे. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील विविध विकासकामांवर मनसेने सवाल उपस्थित केला आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबत आदित्य ठाकरेंनी अनेक आश्वासनं दिली, पण ते प्रश्न सोडवण्यात आदित्य ठाकरेंना अपयश आल्याची टीका मनसेकडून करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने आता मोर्चा उघडला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे, त्यामुळे आगामी काळात मनसे विरुद्ध आदित्य ठाकरे असा राजकीय सामना रंगण्याची चिन्ह आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya Thackeray, MNS, Raj Thackeray, Shivsena