मुंबई, 16 एप्रिल : महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचं संकट घोंघावत असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. मुंबईतील वांद्रे परिसरात परराज्यातील मजुरांची गर्दी जमल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसंच भाजपसमर्थकांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे राजीनामा द्या, अशी मागणी करत #UddhavResign हा ट्रेण्ड चालवला होता. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना राज ठाकरे यांच्या मनसेच्या महिला पदाधिकारी रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
'मुख्यमंत्री साहेब चांगले काम करत आहेत. पण जर महाराष्ट्रचं काही वेडवाकडं (नुकसान) करण्याचा प्रयत्न केलात तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे हे लक्षात ठेवा. ते विनंती नाही करत थेट जाळ काढतात. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहायचे नाही,' असा इशारा देत रुपाली पाटील ठोंबरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
मुख्यमंत्री साहेब चांगले काम करत आहेत पण जर महाराष्ट्रच काही वेडवाकड (नुकसान) करण्याचा प्रयन्त केलात तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव #राज_ठाकरे आहे हे लक्षात ठेवा,
— Rupalipatilthombare (@Rupalipatiltho1) April 15, 2020
ते विनंती नाही करत थेट जाळ काढतात . 🔥🔥महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पहायचे नाही@AUThackeray@AjitPawarSpeaks pic.twitter.com/T0a6uWbIRj
कोरोनाचं संकट आणि राज-उद्धव बंधूंमधील संवाद
राज आणि उद्धव या दोन बंधूंमधील राजकीय संघर्षाची चर्चा नेहमीच होते. मात्र आता कोरोनाच्या संकटकाळात हे दोघेही मतभेद दूर ठेवून एकमेकांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे. कारण कोरोनाच्या आव्हानाबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी राज मला दिलासा आणि सूचना हे दोन्ही देत असल्याचं म्हटलं होतं. तसंच उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधन करत असताना सर्वपक्षीय नेते आपल्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. 'राज आहे...पवार साहेब आहेत..सोनिया गांधी...अमित शहा हे सगळेच या लढाईत आपल्यासोबत आहेत,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
याआधीही केली आहे ठाकरे सरकारची पाठराखण
ठाण्यातील तरुणाने राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेल्या मारहाणीच्या आरोपानंतर राजकीय वाद सुरू झाला. या वादात भाजपनेही उडी घेत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली. तर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली. मात्र राज ठाकरे यांच्या मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने या प्रकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेनं सगळेच अचंबित झाले होते.
मनसेच्या कार्यकर्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या कथित मारहाणीचं जोरदार समर्थन केलं. 'अरे काहीही पोस्ट, कॉमेंट काही करणार का...सोशल मीडिया आहे... आपल्या विकृतीचे साधन नाही हो...चांगले घ्या की सोशल मधून...बर विकृती करायला हात ,मन धजावते कसे...मंत्री असो ,सेलिब्रिटी असो की कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता ,पदाधिकारी याने पोस्ट, कमेंट विकृत करूच नये आणि केली तर विकृतीप्रमाणे मार खावा. जितेंद्र आव्हाड यांच्या बाबत जी काही विकृत पोस्ट केली म्हणून त्याला मारले असेल तर चांगलेच केले असे विकृत ठेचले पाहिजे,' अशा आक्रमक शब्दांत रुपाली पाटील ठोंबरे यांनी आव्हाडांचं समर्थन केलं होतं.
संकलन, संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj Thackeray, Uddhav thackeray