'कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत गडबड', मनसे आमदारानेही उपस्थित केली शंका

'कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत गडबड', मनसे आमदारानेही उपस्थित केली शंका

'कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमागे काहीतरी गडबड आहे,' असा आरोप राजू पाटील यांनी केला आहे.

  • Share this:

कल्याण, 25 फेब्रुवारी : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकही चक्रावले आहे. वातावरणातील बदलांमुळे ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून काही नागरिकांनी याची धास्ती घेतली आहे. लसीचा बाजार, विविध लॅब व इतर अर्थकारणाशी याचा संबंध जोडला जात आहे. याबाबत कुजबूज सुरू असतानाच मनसेने मात्र उघडपणे भूमिका घेतली आहे.

'मागील दोन अधिवेशनांपासून आम्ही लोकप्रतिनिधी हे बोलत होतो. मात्र आता वाढत्या रुग्णसंख्येबाबत सामान्य नागरिकही बोलायला लागले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येबाबत घेण्यात येणाऱ्या शंकेत काहीतरी तथ्य आहे असे मानायला हरकत नाही,' असं विधान कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे.

'लसीचा मुबलक साठा असताना ज्यांना परवडेल ते लोक लस घेऊ शकतात यावर विचार होणे आवश्यक असून वाढत्या रुग्णसंख्येमागे काहीतरी गडबड आहे,' असा आरोप राजू पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा - डॉल्बीसह मिरवणूक काढणाऱ्यांना दणका, तब्बल 60 जणांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, याआधी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही असाच आरोप केला होता. नेमका अधिवेशाच्या तोंडावरच कोरोना कसा वाढतो आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण अधिवेशन जवळ आल्यावरच कशी होती, असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी वाद निर्माण केला होता. देशपांडे यांच्या या आरोपावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांनीही चांगलाच पलटवार केला होता.

'मनसेचा अधिवेशनाशी काय संबंध...? त्यांचा एक आमदार आहे. त्याला गैरहजर राहण्याचा अधिकार आम्ही देऊ. स्टेडियमच्या बाहेर बसणार्‍यांनी मैदानात कसं खेळावं हे शिकवू नये,' अशा शब्दांत अनिल परब यांनी मनसेवर खरमरीत टीका केली होती.

Published by: Akshay Shitole
First published: February 25, 2021, 11:56 PM IST
Tags: kalyanMNS

ताज्या बातम्या