मुंबई, 4 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर 4 मे पासून मशिदींसमोर हनुमान चालिसा लावल्या जातील, असा स्पष्टच इशारा दिला. यानंतर आज राज्यात 4 मे रोजी काही मशिदींवरील भोंगे वापरण्यात आले नाहीत, तर भोंग्यांचा आवाज कमी झाल्याचे पाहायला मिळाल्याची माहिती, राज्याच्या पोलीस सूत्रांनी दिली आहे. राज्यातील याठिकाणी अजानसाठी कोणतेही स्पीकर वापरले गेले नाहीत - परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, शिर्डी, श्रीरामपूर आणि जालना जिल्ह्यातील काही ठिकाणी मशिदींवर कोणत्याही प्रकारचे लाऊडस्पीकर वापरले गेले नाहीत. राज्यातील याठिकाणी परवानगीनुसार मर्यादित आवाजात स्पीकर वापरले - नाशिक, अहमदनगर, जळगाव, मालेगाव आणि जवळजवळ सर्व ठिकाणी कमी आवाजात स्पीकर वापरले गेले. तर यासोबतच सकाळपासून राज्यात सुमारे 250-260 मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मुंबईत पोलिसांनी (Mumbai Police) राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनने राज ठाकरे यांना कलम 149 ची नोटीस बजावली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कसबे यांनी ही नोटीस बजावली आहे. आज संध्याकाळी शिवाजी पार्क पोलिसांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बंदोबस्त वाढवला होता. त्यानंतर राज ठाकरे पत्रक प्रसिद्ध करून माघार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
हेही वाचा - कॅप्शन न देता राज ठाकरेंनी Tweet केला बाळासाहेबांच्या ‘त्या’ भाषणाचा Video
दरम्यान, राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आज एक पत्र प्रसिद्ध करून सर्वांना आवाहन केले आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.
राज ठाकरेंचं आव्हान ‘हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी “सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत” हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे’ असं आव्हानच राज ठाकरेंनी दिलं आहे.