मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. मात्र या दौऱ्यात आज दुसऱ्यांदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे मनसेने देखील या वादात उडी घेतली आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील मनसे सैनिकांनी शेगावला जावे, असे थेट आदेशच आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिले आहेत. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेगावला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर देखील जोरदार निशाणा साधला आहे.
'चोख प्रत्युत्तर देणार'
सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना आम्ही चोख प्रत्युत्तर देणार. आमच्या अविनाशने मोठ्या, मोठ्या लोकांचे माज उतरवले आहेत, त्यामुळे त्याला देखील बरोबर घेऊन जात आहोत. पोलिसांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करणार असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे. दरम्यान त्यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना देखील खोचक टोला लगावला आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांच्या गळ्यात गळे घालून महाराष्ट्रातले नेते चालत असल्याचं देशपांडे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : राहुल गांधींच्या 'भारत जोडो'त आदित्य, पण बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी महाविकासआघाडी नाही, शिवसैनिक नाराज!
संजय राऊतांना टोला
दरम्यान यावेळी संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. संजय राऊत कोण आहेत?, त्यांनी साधा निषेध देखील व्यक्त केला नाही. आधी त्यांनी निषेध वक्त करावा. मात्र ते निषेध व्यक्त करू शकणार नाहीत. सावरकर किती वर्ष तुरुंगात होते आणि नेहरू किती वर्ष होते? हे सर्वांना माहित आहे, हा इतिहास असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : Nashik : बाळासाहेब ठाकरेंची रोज पूजा करणारा कडवट भक्त, पाहा Video
वाद पेटणार?
तीन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, यावरून वाद निर्माण झाला होता. भाजपनं काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. मात्र आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आता या वादात मनसेने देखील उडी घेतली आहे. मनसैनिक राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शेगावला जाणार आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून राहुल गांधी यांच्या या वक्तव्याविरोधात राज्यभरात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आता हा वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, MNS, Rahul gandhi, Raj Thackeray, काँग्रेस