मुंबई, 1 ऑगस्ट: नुसतं 'पुनःश्च हरी ओम' म्हणून चालणार नाही तर त्यासाठी सरकार म्हणून काही लोकहितार्थ निर्णय देखील तात्काळ घ्यायला हवे, अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
दिल्ली सरकारनं डिझेलवरील मूल्यवर्धित कर (VAT)जवळपास 9 रुपयांनी कमी करून लॉकडाऊनच्या काळात जनतेला दिलासा दिला आहे. अगदी तशीच अपेक्षा बाळा नांदगावकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून व्यक्त केली आहे.
हेही वाचा....स्टुडिओ मालकाच्या छळाला कंटाळून फोटोग्राफरची आत्महत्या, नातेवाईकांचा राडा
कोरोनामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सगळीच अर्थव्यवस्था खालावली. सरकारचा महसूल घटला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर वरचा व्हॅट 2 रुपयांनी वाढवला होता. सरकारच्या या निर्णयाला देखील मनसेनं विरोध केला होती. पेट्रोल-डिझेलवर नाही तर दारुवर कर वाढवा, अशी मागणी मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केली होती. आता मात्र, बाळा नांदगावकर यांनी ट्वीट करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच निशाणा साधला आहे.
काय आहे ट्वीट...
नुसते पुनःश्च हरी ओम म्हणून चालणार नाही तर त्यासाठी सरकार म्हणून काही लोकहितार्थ निर्णय देखील तात्काळ घ्यायला हवे, जसे दिल्ली सरकारने डिझेल वरील VAT जवळपास 9 रुपये ने कमी केले आणि जनतेला दिलासा दिला तसे
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) August 1, 2020
इंधनाचे दर इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात जास्त...
महसूल तूट भरून काढण्यासाठी राज्यसरकारने नुकतीच पेट्रोल व डिझेल वर 2 रुपये मूल्यवर्धित कर (VAT) वाढविला , सरकारने याऐवजी मद्यावरील कर वाढवावा हे मार्च महिन्यापासून सुचवित आहे कारण आधीच आपल्या राज्यात इंधनाचे दर ईतर अनेक राज्यांपेक्षा जास्त आहेत व त्यात हा अधिभार.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) June 8, 2020
बाळा नांदगावकर यांनी यापूर्वीही राज्य सरकारवर टीका केली होती. दारु विक्रीला सरकारनं परवानगी दिली तेव्हा नांदगावकर यांना निशाणा साधला होता. देशातील अनेक राज्यात त्या त्या सरकारांनी दारुवर भरमसाठ कर लादला होता. तोच धागा पकडत बाळा नांदगावकर यांनी 'पेट्रोल-डिझेलवर नाही तर दारुवर कर वाढवा', अशी मागणी केली होती.