मुंबई, 31 जुलै: कोरोनामुळे संपूर्ण देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यानं मोठी मदत केली होती. परप्रांतीय मजुरांना त्याच्या गावी पोहोचवण्यासाठी मोफत बसगाड्या, रेल्वे गाड्यांची व्यवस्था करून सोनू सूद यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ऐनवेळी 'देवदूत' बनून आलेल्या सोनू सूदच्या कामाची सर्वत्र प्रशंसाही झाली होती. एवढंच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोनूच्या कामाचं कौतुक केलं होतं. आता मात्र राज ठाकरे यांनीच सोनू सूद याच्या आर्थिक क्षमतेबाबत शंका उपस्थित केली आहे. सोनू सूदला कोणाचं आर्थिक पाठबळ आहे, ते भविष्यात कळेलच, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा...पावसात भाषण केल्यानं हमखास यश मिळतं, रावसाहेब दानवेंची शरद पवारांना कोपरखळी
'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यानं लॉकडाऊन काळात स्थलांतरित मजुरांना मदत केली. त्याच्या कामाची प्रशंसा झाली, तितकीच त्याच्यावर टीका देखील झाली. मात्र, त्यानं आपलं काम सुरूच ठेवलं आताही सोनू गणेशभक्तांसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गाड्यांची व्यवस्था करत आहे. याबद्दल राज ठाकरे यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी याबाबत परखड मत मांडलं आहे.
सोनू सूद चांगलं काम करतोय त्याबाबत दुमत नाही परंतु इच्छा सगळ्यांची असते तरीही आर्थिक परिस्थितीमुळे ते करता येत नाही. सोनूला आर्थिक पाठबळ कुणाचं हे पुढे जाऊन कळेल#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन#RajThackeray
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 31, 2020
'सोनू सूद जे काम करतोय ते त्याचं एकट्याचं डोकं आहे, असं मला वाटत नाही. त्याला कोणीतरी आर्थिक मदत करत असावं. तो काही काही एवढा मोठा कलाकार नाही किंवा श्रीमंत नाही. तो चांगला अभिनेता असेलही, पण त्याची आर्थिक बाजू इतकी भक्कम नाही. तरीही तो मदत करतोय. त्याची आर्थिक स्थिती काय आहे? त्यामागे कोण आहे?, हे एकदा तपासलं पाहिजे,' असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
सोनू सूद चांगलं काम करतोय त्याबाबत दुमत नाही परंतु इच्छा सगळ्यांची असते तरीही आर्थिक परिस्थितीमुळे ते करता येत नाही. सोनूला आर्थिक पाठबळ कुणाचं हे पुढे जाऊन कळेल, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
लॉकडाऊनमधून मनोरंजन क्षेत्राला आता मोकळीक द्यायला हवी. तिथे उगाच काही वाकडेतिकडे नियम लावता कामा नये. आज जगातील अनेक देशांत सगळं काही सुरळीत झालं आहे. पुरेशी काळजी घ्यायला पाहिजे पण आता बंद ठेवणं हा मार्ग नाही,' असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा...'बकरी ईद'वरून महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजीचा सूर, काँग्रेस आमदार म्हणाले...
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील सोनू सूद करत असलेल्या मदतीवर शंका उपस्थित केली होती. सोनू सूद याचं भाजपशी कनेक्शन असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, सोनू सूदनं काम सुरूच ठेवलं आहे.