मुंबई, 16 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या अजूनही कमी होण्याचं नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला एक पत्र लिहिलं आहे. 'कोरोनाशी निव्वळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व राज्यातील प्रशासनं दोन हात करत आहेत, बहुसंख्य नागरिक देखील प्रशासनाच्या निर्देशांचं काटेकोर पालन करत आहेत आणि त्यामुळे ह्या आजाराचा जलदगतीने होणारा प्रसार आपण बऱ्यापैकी रोखू शकलो आहोत आणि आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या देखील आश्वासक आहे. ह्याबद्दल ह्या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचं जेवढं कौतुक करावं ते कमीच आहे,' असं राज ठाकरे म्हणाले. तसंच यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या संभाषणाविषयीही भाष्य केलं आहे.
'कल्याणमध्ये तर ६ महिन्याची मुलगी ह्या आजारातून बरी होऊन घरी आली, तिच्यासारखे हजारो जणं ह्या आजारावर मात करून बाहेर पडलेत हे दिलासादायक आहे. पण ह्या आकडेवारीला ना सरकारी पातळीवर पुरेशी प्रसिद्धी दिली जात आहे ना माध्यमांमध्ये ह्यावर चर्चा होताना दिसत आहे. कालच मी राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्याशी बोलून ही बाब त्यांच्या देखील निदर्शनास आणून दिली,' अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.
नक्की काय म्हणाले राज ठाकरे?
"कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा मोठा आहे त्याला देखील योग्य प्रसिद्धी दिली गेली तर नागरिकांचा आपल्या डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल आणि सातत्याने भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळेल. अर्थात आजार नियंत्रणात आहे हे दाखवलं गेलं तर नागरिक लगेच बाहेर पडतील असा जर समज असेल तर तो चुकीचा आहे आणि ३ मे पर्यंतच्या लॉकडाऊनच लोकं पालन करतील ह्याविषयी शंका नाही.
याच्याशी निगडित दुसरा भाग म्हणजे एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे किंवा तशी शक्यता आहे असं जरी आढळलं तरी त्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. हा प्रकार चुकीचा तर आहेच पण तो आपल्या सर्वांना नुकसानकारक ठरेल. ह्या आजाराच्या नुसत्या शंकेने सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार घडत असतील तर लोकांचा कल त्याची लक्षणं लपवण्याकडे राहील आणि पर्यायाने लॉकडाऊनसकट केलेल्या अनेक उपाययोजना निष्प्रभ ठरतील. हा आजार संसर्गजन्य आहे हे मान्य पण टी.बी. सारखे अनेक आजार हे संसर्गजन्य असताना देखील आपण त्या रुग्णांना वाळीत टाकलं नाही तर आत्ताच हे का?
ह्यावर एकच उपाय म्हणजे ह्या आजारावर मात केली जात आहे, रुग्ण ठणठणीत बरे होऊन बाहेर पडत आहेत ह्याचे आकडेवारी देणारं एक 'न्यूज बुलेटिन' आठवड्यातून एकदा सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने जारी करावं. माध्यमांनी देखील ह्या मुद्द्याच गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवावं!
माझं पुन्हा एकदा जनतेला आवाहन आहे की घाबरून जाऊ नका, पुरेशी काळजी घ्या आणि समाजमाध्यमांवर येणाऱ्या गोष्टींची नीट खातरजमा करा, त्यावर सरसकट विश्वास ठेऊन कोणतीही आततायी कृती करू नका. ह्या सगळ्यावर मात करून लवकरच जनजीवन पूर्ववत व्हावं हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Raj Thackeray, Uddhav thackeray