ठाणे, 9 मार्च : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. ठाण्यामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांनी मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. या भाषणातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. हिंदुत्वाला मानता म्हणजे नेमकं काय असतं तुमचं? भोंगा प्रकरणानंतर अयोध्याला जाणार होतो, पण विरोध करणारे हिंदुत्ववाले होते, ज्यांनी हे सगळं केलं, त्याचं पुढे काय झालं? असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप खासदार बृजभूषण चरणसिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांचा दाखला दिला. बृजभूषण चरणसिंग यांच्यावर निशाणा साधताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरही प्रहार केला. मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठीच्या आंदोलनावेळी मनसेच्या 17 हजार कार्यकर्त्यांवर केस टाकल्या, नंतर मुख्यमंत्रीपद गेलं. आपल्या वाटेला जायचं नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. हल्लेखोरांना इशारा याच भाषणातून राज ठाकरे यांनी संदीप देशपांडेंवर हल्ला करणाऱ्यांनाही इशारा दिला. ‘आत्मचरित्राची चार पानं वाढली, त्यादिवशी घटना घडली त्यावर मी काही बोललो नाही. कुणी केलं असेल, असं लोक विचारत आहेत. एक निश्चित सांगतो, त्याला आधी कळेल त्याने हे केलं आहे. मग सगळ्यांना कळेल, हे त्यांनी केलं आहे. माझ्या मुलाचं असं रक्त वाया घालू देणार नाही. महाराष्ट्रासाठी काम करण्यासाठी आलोय, या फडतूस लोकांसाठी नाही,’ असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
सत्तेपासून दूर नाही प्रत्येक राजकीय पक्षाला त्रास होतो. भाजपची स्थापना 1952 साली जनसंघ म्हणून झाली, त्यांना सत्तेत यायला इतका काळ जावा लागला, आपण सत्तेपासून दूर नाही. मी आशा दाखवत नाही, तर मला माहिती आहे. महापालिका निवडणुका होऊ दे, आपण सत्तेत असणार, कारण जनता या सगळ्यांना विटलेली आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना नवी उर्जा दिली. 22 तारखेला गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. जे काही वाभाडे काढायचे आहेत, ते 22 तारखेला काढणार, असं राज ठाकरे म्हणाले.

)







