बुलडाणा, 21 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताज्या वक्तव्याने राज्यभरात वादंग उठलाय. 'छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत', असं राज्यपालांनी म्हटलं होतं. यावरुन विरोधी पक्षांनी भाजप आणि राज्यपालांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. तसेच यानंतर आता शिंदे गटातील आमदाराने राज्यपालांवर टीका केली आहे.
काय म्हणाले शिंदे गटातील आमदार -
या राज्यपालाला कुठंही नेऊन घाला, असे वक्तव्य शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी केलंय. तसेच भगतसिंग कोश्यारी यांना राज्याच्या राज्यपाल पदावरून काढा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यानंतर, असं वक्तव्य खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अशा प्रकारचा छत्रपतींचा अपमान होत राहिला तर आम्ही खपवून घेणार नाही, अन्यथा याचे परिणाम शिंदे-फडणवीस सरकारवर होईल, असेही ते म्हणाले आहेत.
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद उद्गार काढले. इतकंच नाही तर छत्रपती यांना कमी लेखण्याचं काम केलं. छत्रपती यांची उंची देशभर नाही तर जगभर आहे. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा मूळ शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
हेही वाचा - इतिहासामुळे वादात सापडलेल्या भगतसिंग कोश्यारींचा इतिहास, अशी झाली राजकारणात एण्ट्री!
तर या राज्यपालाला कुठंही घाला, असं बोलत त्यांना महाराष्ट्रमधून हटवा अशी मागणीही त्यांनी केली. भाजपचे केंद्रीय प्रवक्ते यांचाही समाचार घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जर यापुढं अस घडलं तर या शिंदे फडणवीस सरकारला धोकादायक ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सुषमा अंधारेंची राज्यपालांवर जोरदार टीका -
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. 'आरएसएसच्या शाखेतून शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला जातो. तेव्हाच प्रश्न विचारले असते तर आज काळा टोपीवाला असं बोलला नसता,' अशी टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
नुसतं डोळ्याला पाणी लावून नमो नमो करणं म्हणजे हिंदुत्व नव्हे. राज्यपाल निरपेक्ष असले पाहिजेत. आताचे राज्यपाल म्हणजे भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते वाटतात. जर गडकरी भाजपला आदर्श वाटत असतील, तर मोदींसाठी गडकरींना अडगळीत का टाकलं? तेव्हा राज्यपाल कुठे गेले होते?' असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी विचारला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatrapati shivaji maharaj, Governor bhagat singh, Maharashtra politics