जळगाव, 4 सप्टेंबर : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केली आहे. "Who is आदित्य ठाकरे? गोधडीत पण नव्हता. आम्ही तेव्हाही शिवसेनेत होतो. याला काय अधिकार आमच्यावर टीका करण्याचा?", अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी निशाणा साधला. जळगावातील कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या अनोख्या शैलीत आज भाषणातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाषणातून निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.
यावल तालुक्यातील न्हावी येथे भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, लोकनियुक्त सरपंच भारती नितीन चौधरी, उपसरपंच उमेश बेंडाळे, माझी पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी यांच्या पाठपुरावाने गावासाठी ही पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
"शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर टीका होत आहे. गेल्या 35 वर्षात आम्ही काय केले ते आम्हाला माहिती आहे. झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे आम्ही आहोत. तडीपार होणारे आम्ही, जेलमध्ये जाणारे आम्ही, मात्र ते 32 वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतं. तू गोधडीत पण नव्हता, तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत", असा घणाघात गुलाबराव पाटलांनी केला.
('अचानक पोलीस स्टेशनमधून फोन आला...'; विजू मानेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट)
"तुम्ही इस्टेटचे वारसदार होऊ शकतात. मात्र विचारांचे वारसदार होऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसदार हा गुलाबराव पाटील आहे. कोण आदित्य ठाकरे? यांना काय अधिकार आहे आमच्यावर टीका करण्याचा?", असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला.
"शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की, गेलेल्या आमदारांना परत बोलवा. असं केलं असतं तर सरकार वाचू शकलं असतं. मात्र त्यावेळी त्यांच्याकडून उडाले ते कावळे, राहिले ते मावळे अशी भाषा वापरण्यात आली. 35 वर्ष एकच झेंडा, एकच विचार आणि हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणारे आम्ही आणि आमच्या टीका करतात. या टीका करणाऱ्यांची लाज वाटते", असा घणाघात संजय राऊतांनी केला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे संजय राऊत यांच्यावरही टीका केली. "चहा पेक्षा किटली गरम", असा टोला गुलाबराव पाटलांनी राऊतांना लगावला. "कोण संजय राऊत? आमदाराने मत दिली म्हणून ते खासदार झाले", अशीदेखील टीका गुलाबराव पाटलांनी केली.
"ज्याप्रमाणे अली बाबा के चालीस चोर थे, तसं आम्ही शिंदे बाबा के चालीस, मी गुवाहाटी गेलो. तेव्हा पत्नी-मुलांचे फोन आले की परत या. पण आता परत येत नाही असं म्हणत ही संघर्षाची कहाणी. ज्याप्रमाणे अली बाबा के चालीस चोर थे तसं आम्ही शिंदे बाबाके चालीस. या शब्दात इतिहास लिहिला जाईल", असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
"शिवसेनेतून बाहेर पडल्यावर काही लोक म्हणतात की तेरा क्या होगा कालिया? मात्र आहे आमचा गब्बर आहे", असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिलं. "परिणामांचा विचार करणारा राजकारणात चालत नाही. संघर्ष जीवनाची यात्रा आहे", असं सुद्धा यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gulabrao patil, Politics