मुंबई, 4 सप्टेंबर: प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता विजू माने (Viju Mane) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर विविध व्हिडीओ, फोटो शेअर करत ते चाहत्यांशी कनेक्ट राहतात. याशिवाय त्यांच्या आगामी प्रोजेक्टविषयीही ते सांगत असतात. अशातच विजू मानेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी लांबलचक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलंय.
विजू मानेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती. यावेळीचे फोटो शेअर करत विजू मानेंनी त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. विजू मानेंनी लिहिलं की, 'खरंतर माझ्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला दरवर्षी ते येतात. पण यावर्षी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते त्यामुळे मनात कितीही वाटत असलं तरी ते येतील का याबद्दल शंका होती. पण अचानक पोलीस स्टेशनमधून फोन आला मुख्यमंत्री तुमच्या घरी येत असल्यामुळे सुरक्षा लक्षात घेता काही पोलीस तपासणी करता तुमच्या घरी येतील... आणि खरंच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे माझ्या घरी आले. मनमोकळ्या गप्पा मारल्या. सोबत खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि माजी महापौर, शिवसेना प्रवक्ते, आमचे मित्र नरेश म्हस्के हेसुद्धा होते दरवर्षीप्रमाणे'.
हेही वाचा - 'लावणी ही महाराष्ट्राची...'; लावणीवर टीका करणाऱ्यांना अमृता खानविलकरचं सडेतोड उत्तर
विजू मानेंनी पुढे लिहिलं की, 'खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी देखील कितीही उशीर झाला तरी माझ्या घरच्या बापाचं दर्शन घेण्याची आपली सवय मोडली नाही. मला चांगलं आठवतंय गेल्यावर्षी रात्री दीड वाजता खासदार माझ्या घरी आले होते. आणि तेव्हाही जवळपास अर्धा तास अत्यंत छान चर्चा झाली होती.
प्रत्येक जवळच्या माणसाच्या, कार्यकर्त्याच्या..खरंतर आमंत्रण देणाऱ्या कुणाच्याही घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेणे ही स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेली शिकवण आहे. राजकारणातील उलथापालथ हा प्रत्येकाच्या चर्चेचा आवडीनिवडीचा विषय असतो. पण आपल्यासाठी तो माणूस महत्त्वाचा असतो जो आपल्या अत्यंत महत्त्वाच्या वेळेला धावून आलेला असतो. माझ्या बाबतीत मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे ते स्थान आहे. आणि मी कृतज्ञता व्यक्त करण्याला कायम प्राधान्य देणारा माणूस आहे. मला शक्य तेव्हा, शक्य तिथे, शक्य त्या कार्यक्रमात मी त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानत असतोच'.
View this post on Instagram
"या शिवाय गेली अनेक वर्ष मी त्यांना ओळखतोय. सामान्य माणसात मिसळून धडाडीने काम करण्याचा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांच्या धाडसाची बरोबरी करू शकेल असा एकही नेता मी पाहिलेला नाही. महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली त्यावेळी पुरात उतरून त्या रेल्वेत पोहोचून प्रवाशांना धीर देणे, सांगली कोल्हापूरच्या पुरात अगदी खांद्याइतक्या पाण्यात उतरून पूरग्रस्त लोकांच्या जवळ जाऊन त्यांना मदत करून भविष्यासाठी आश्वस्त करणे आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे ज्याकाळी माणूस शिंकला तरी पाचावर धारण बसायची अशा काळात पीपीई किट घालून स्वतः करोना रुग्णांना आधार द्यायला त्यांच्या प्रत्यक्ष जवळ पोहोचणारे नेते किती होते हे आठवून पहा. मी आणि माझा मित्र संदीप वेंगुर्लेकर आम्ही नेहमी म्हणतो, "तसं पाहिलं तर आपल्याला सगळेच राजकारणी सारखेच. अनेक पक्षातल्या अनेक नेत्यांशी छान संबंध", असंही विजू माने म्हणाले.
दरम्यान, मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे सोशल मीडियावर स्पष्टमपणे आपलं मत व्यक्त करत असतात. त्यातीलच एक नाव म्हणजे विजू माने होय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm eknath shinde, Eknath Shinde, Instagram post, Marathi entertainment