जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MCA Election : 'सावली' मैदानात, पण तीनही ठाकरेंचं मत नाही, मिलिंद नार्वेकरांचं काय झालं?

MCA Election : 'सावली' मैदानात, पण तीनही ठाकरेंचं मत नाही, मिलिंद नार्वेकरांचं काय झालं?

MCA Election : 'सावली' मैदानात, पण तीनही ठाकरेंचं मत नाही, मिलिंद नार्वेकरांचं काय झालं?

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये शरद पवार-आशिष शेलार पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 ऑक्टोबर : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये शरद पवार-आशिष शेलार पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. अध्यक्षपदाच्या सामन्यात पवार-शेलार पॅनलच्या अमोल काळे यांनी संदीप पाटील यांचा पराभव केला. अमोल काळे यांना 183 आणि संदीप पाटील यांना 150 मतं मिळाली. याशिवाय मयंक खांडवाला सचिव, अरमान मलिक खजिनदार तर गणेश अय्यर गव्हर्निग काऊन्सिलच्या निवडणुकीत विजयी झाले. हे सगळे पवार-शेलार पॅनलमधून मैदानात होते. एमसीएच्या अॅपेक्स काऊन्सिलच्या 9 जागांसाठी 23 जण रिंगणात होते, यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचाही समावेश होता. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. ठाकरेंची सावली म्हणूनही मिलिंद नार्वेकर यांची ओळख आहे. एमसीएच्या या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर रिंगणात होते, पण तरीही ठाकरे मतदानाला आले नाहीत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे एमसीएचे सदस्य आहेत, पण तिघांनीही निवडणुकीकडे पाठ फिरवली. नार्वेकर विजयी तीनही ठाकरे निवडणुकीला आले नाहीत, तरीही मिलिंद नार्वेकर विजयी झाले. मिलिंद नार्वेकर यांना 221 मतं मिळाली. अॅपेक्स काऊन्सिलच्या उमेदवारांमध्ये मिलिंद नार्वेकरांना मिळालेली ही सर्वाधिक मतं आहेत. ठाकरेंची दांडी का? उद्धव, आदित्य आणि तेजस ठाकरे एमसीएचे सदस्य असूनही मतदानाला का आले नाहीत? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. एमसीए निवडणुकीच्या आदल्या दिवशी पवार-शेलार पॅनलचे सगळे नेते एकत्र आले होते. शरद पवारांनी या पॅनलसाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला शरद पवारांसह मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस , आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक सहभागी झाले होते. या नेत्यांनी पवार-शेलार पॅनलला विजयी करण्याचं आवाहन केलं होतं. महाराष्ट्रात घडलेल्या सत्ता संघर्षानंतर सर्वपक्षीय नेते एकत्र आले, त्यामुळे ठाकरे कुटुंबाने एमसीए निवडणुकीत मतदान केलं नाही का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात