बीड, 16 नोव्हेंबर: बीड (Beed) जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका लग्न जमत नसलेल्या तरुणाची सुमारे दीड लाखांची फसवणूक (1.5 Lakh fraud) करण्यात आली आहे. पीडित मुलाचं लग्न जमत नसल्याचं पाहून आरोपींनी लग्न जमवून देण्याच्या बदल्यात फिर्यादीकडून दीड लाख रुपये घेतले आहेत. तसेच एका मुलीसोबत लग्नही (Marriage fraud) लावून दिलं. मात्र लग्नानंतर अवघ्या तीनच दिवसात नवविवाहित तरुणी पळून गेली आहे.
याप्रकरणी पीडित तरुणानं धारुर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक ताराचंद मोरे असं फसवणूक झालेल्या 28 वर्षीय तरुणाचं नाव असून तो धारुर तालुक्यातील कारी येथील रहिवासी आहे. फिर्यादी तरुण एका कारखान्यावर मजूर म्हणून काम करतो.
हेही वाचा-पत्नीचा अश्लील VIDEO बनवून पतीला अडकवलं जाळ्यात; तरुणासोबत घडला विचित्र प्रकार
फिर्यादी मोरे हा गेल्या काही वर्षांपासून लग्नासाठी प्रयत्न करत होता. पण त्याचं लग्न काही जमत नव्हतं. लग्न जमत नसल्याने त्याला नैराश्य आलं होतं. दरम्यान आरोपींनी फिर्यादीला लग्न जमवून देण्याचं आश्वासन दिलं. पण तत्पूर्वी एक अट घातली. लग्न करायचं असेल तर नवऱ्या मुलीला दीड लाख रुपये हुंडा द्यावा लागेल, असं मध्यस्थी करणाऱ्या आरोपींनी सांगितलं. फिर्यादी तरुणही लग्नासाठी मुलीला दीड लाख रुपये हुंडा देण्यास तयार झाला. त्यानुसार त्यानं मुलीला दीड लाख रुपयेही दिले.
हेही वाचा-दिवसभर एकत्र फिरले अन् रात्री घडलं भलतंच; मित्राच्या हातूनच तरुणाचा दुर्दैवी अंत
यानंतर, मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला. नवविवाहित तरुणी फिर्यादीच्या घरी नांदायला देखील आली. पण लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी आरोपी तरुणीनं आपला खरा रंग दाखवला आहे. तिने तिसऱ्याच दिवशी घरातून पोबारा केला आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित तरुणानं धारुर पोलीस ठाण्यात पत्नीसह एकूण पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Crime news, Marriage, Money fraud