बीड 21 फेब्रुवारी : जिल्ह्यातील वर्गमित्र असलेले दोन तरुण प्रशासकीय अधिकारी लाच स्वीकारताना एसीबीच्या (ACB) जाळ्यात अडकले आहेत. यामुळं जिल्ह्यात लाचखोर अधिकाऱ्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. श्रीकांत गायकवाड हे बीडच्या माजलगावचे उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) म्हणून कार्यरत होते. तर नारायण मिसाळ हे पाटोदा आणि बीड पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. श्रीकांत गायकवाड यांना वाळूची गाडी सुरू ठेवण्यासाठी 65 हजारांची लाच (Bribe) घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
श्रीकांत गायकवाड
चालकामार्फत गायकवाड यांनी ही लाच स्वीकारली होती. याच्याच एक दिवस आधी त्यांचे वर्गमित्र असलेले पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांनादेखील विहिरीच्या मंजुरीसाठी लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
नारायण मिसाळ
विशेष म्हणजे मिसाळ यांना भेटण्यासाठी गायकवाड हे एसीबीच्या कार्यालयात गेले होते. त्यानंतर तिथून थेट माजलगावला गेले आणि माजलगावमध्ये आपल्या चालकामार्फत लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांनादेखील अटक केली आहे. गायकवाड आणि मिसाळ हे दोघेही वर्गमित्र असून आता दोघेही एसीबीच्या ताब्यात आहेत. सलग दोन दिवस झालेल्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.

)







