बीड, 1 सप्टेंबर- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गळतीच्या पायवाटेचा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. कोण बाकी राहिलं आता…? असा सवाल करत राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला आता ‘शोध यात्रा’ म्हटलं पाहिजे, असा टोला राज्याचे रोहयो मंत्री आणि शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत आगोदर मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रमुखांनी मला जबाबदारी दिली. मी प्रवेश करुन पायवाट तयार केली. आता पायवाटेचा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. पक्षांतर करायचय. पण कोण बाकी राहिलं आता, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आता शोध घेण्याची यात्रा आहे, असा चिमटाही जयदत्त क्षीरसागर यांनी काढला आहे. विधासभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वासही क्षीरसागर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. बीड मधील शिवसेना महिला मेळाव्याच्या कार्यक्रमात जयदत्त क्षीरसागर बोलत होते. वेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, प्राचार्या दिपाताई क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण, आयोजक डॉ.सारिका क्षीरसागर, कमलताई बांगर, प्रमिला माळी, शुभांगी कुदळे व्यासपीठावर उपस्थिती होत्या. सणांचे दिवस असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती पाहता शिवसेनेला व्यापक रूप मिळत आहे. मंत्रिपद कशासाठी तर जनतेच्या हितासाठी आहे, गोरगरीब जनता हेच शिवसेनेचे कायम केंद्रबिंदू राहिले आहे. म्हणूनच बीड शहरात जनतेच्या आरोग्यासाठी 300 खाटाच्या शासकीय रुग्णालय लवकर उभे राहणार आहे. शहरवासियांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. सध्या बीड जिल्हा दुष्काळाचा सामना करत आहे. निसर्गाची अवकृपा आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होईल. त्यासाठी आपण समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, परिस्थिती बदलण्यासाठी आता महिलांनी ही धनुष्य हातात घ्यायचा आहे, असे आवाहन यावेळी जयदत्त क्षीरसागर यांनी केले. VIDEO: ‘आघाडीची हवा संपली हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही’, मुख्यमंत्री फडणवीस यांची तुफान फटकेबाजी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







