...तर सगळ्याच समजाचं आरक्षण रद्द करा, खासदार उदयराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य

...तर सगळ्याच समजाचं आरक्षण रद्द करा, खासदार उदयराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. आरक्षणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

  • Share this:

सातारा, 27 सप्टेंबर: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी सरकारविरोधात एल्गार पाहायला मिळत आहे. तर राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. आरक्षणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यात आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठं विधान केलं आहे. 'मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळ्याच समाजाचं आरक्षण रद्द करा. गुणवत्तेनुसार, मेरिटवर सर्वांची निवड करा', अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

हेही वाचा...पुण्यात महिला डॉक्टरचा विनयभंग, जम्बो कोविड हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार

पुण्यात 3 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण प्रश्नावर विचारमंथन बैठक होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण घेऊन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी साताऱ्यात गेले होते. विनायक मेटे यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. या भेटीनंतर खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाच्यामुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला.

मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट..

उदयनराजे यांनी सांगितलं की, मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर समाजात प्रचंड रोष आहे. इतक समाजाला ज्या पद्धतीनं आरक्षण मिळालं, त्याच पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा,' असे उदयनराजे म्हणाले. इतर समाजात कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

देवानं प्रत्येकाला बुद्धी दिली आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिज. अभ्यास करुन चांगले गुण असूनही अ‍ॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे. यापूर्वीही मी म्हणालो होतो सर्व आरक्षण रद्द करुन आर्थिक निकषावर आरक्षण द्या, मात्र तसे झाले नाही,' अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी यावेळी दिली आहे.

दोन्ही गाद्या एकत्र, उगाच भांडणं लावणाऱ्यांना ठोका; संभाजीराजे छत्रपतींचा आदेश

दरम्यान, नाशिकमध्ये काल मराठा समाजाची राज्यस्तरिय बैठक झाली. या बैठकीला खासदार संभाजीराजे भोसले उपस्थीत होते. सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या आता एकत्र आल्या आहेत. त्यामुळे उगाच भांडणं लावणाऱ्यांना ठोका, असा आदेशच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या समर्थकांना दिले आहेत.

सर्व मराठा संघटना एकत्र या, आपली ताकद काय आहे ते दाखवून देऊ. सर्व प्रकारच्या जबाबदारी निश्चित ठरवू, समाजातील सर्व विद्वानांना एकत्र करू आणि वेगवेगळ्या प्रेशर टाकणाऱ्या समिती तयार करू, असंही संभाजी राजे यांनी यावेळी सांगितलं. मराठा आंदोलकांनी भावनिक होऊ नका, काही गोष्टी गनिमी काव्यानं करायच्या असतात, असं आवाहन देखील संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिक येथील मराठा आंदोलनाच्या राज्यस्तरिय बैठकीत दिला.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी ही नाशिक येथे राज्यस्तरीय बैठक आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील सर्व मराठा संघटना एकाच छताखाली एकत्र आल्या होत्या. खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिनिधी म्हणून यशराजे पाटील तर राज्यातील 22 जिल्ह्यांचे समन्वयक सहभागी झाले होते.

हेही वाचा...शिवसेनेनं काँग्रेसला फसवलं! फडणवीस-राऊत भेटीनंतर काँग्रेस नेत्याचा निशाणा

मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत मंजूर झालेले 25 ठराव...

1.आर्थिक निकषांवर आरक्षण नको. (इडब्लूएस) आरक्षण नको.

2. प्रत्येक ग्रामपंचायतमार्फत मराठा क्रांती मोर्चाने अधिकृतरित्या दिलेले निवेदन जिल्हाधिकारी (शासन) यांना द्यावे.

3. येत्या 2 ऑक्टोबरला खासदार, आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणे.

4. मराठा क्रांती मोर्चातील तरुणांवर दाखल असलेले सर्व गुन्हे सरकसकट मागे घेणे.

5. सन 2019 मध्ये एमपीएससीमध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांची निवड संरक्षित करणे.

6. अतिवृष्टीमुळे फळबागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टरी 1 लाख व इतर पिकांसाठी 60 हजार रूपये भरपाई.

7. केंद्र सरकारने मराठा आरक्षण स्थगितीची दखल न घेतल्यास दिल्लीवर क्रांती मोर्चा.

8. येत्या 5 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील प्रत्येक तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणे.

9. सारथी संस्थेच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजी राजे यांची नियुक्ती करावी. सारथीला एक हजार कोटीचा निधी द्यावा.

10. राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये मराठा समाजासाठी 12 टक्के जागा वाढवून त्यासाठी आर्थिक तरतूद करावी.

11. सर्व स्तरातून येणाऱ्या निवेदनाचा मसूदा एकसारखा असावा.

12. प्रत्येक विषयासाठी अभ्यास तज्ज्ञांची विषयानुरूप वेगवेगळी समिती स्थापन करावी.

13. राज्य शासनाने राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे एसइबीसी प्रवर्ग 102 घटनादुरूस्तीनुसार नोटीफाय करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवावा.

14. राज्य शासनाने केंद्र शासनाला राज्यघटनेमध्ये दुरूस्ती करून 50 टक्क्यांची मर्यादा रद्द/ संपविण्यासाठी करण्यासाठी विनंती प्रस्ताव पाठवावा.

15. राज्य सरकारने आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत वाढीव जागांची तरतूद(सुपर न्युमररी) करून आर्थिक तरतूद करावी

16. सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडणाऱ्या जेष्ठ वकीलांना ब्रिफींग करण्यासाठी सुचवलेल्या वकीलांची समिती तात्काळ गठीत करण्यात यावी.

17. आरक्षणाचा प्रश्न घटना दुरूस्तीमुळे सुटणार असल्याने केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी दिल्लीमध्ये मराठा क्रांती मोर्चा आयोजीत केला पाहीजे.

18.ज्या योजनांबाबत सरकारने घोषणा केल्या आहेत.त्यांची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहीजे..

19. आठ ते दहा लोकांची समिती नियुक्त करून त्या समितीलाच शासन प्रशासनाशी चर्चा करण्याचे अधिकार द्यावेत..

20. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत,आंदोलनाबाबत माध्यमांना माहीती देण्यासाठी अधिकृत अभ्यासू प्रवक्ते नियुक्त करावेत..त्यांनीच माध्यमांशी संवाद करावा.

21. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी.

22. भविष्यातील कुठलेही आंदोलन शांततेच्या मार्गाने व्हावे.मराठा क्रांती मोर्चाची परंपरा कायम राखावी

23. कुठल्याही मागास वर्ग समाजाच्या विरोधात क्रांती मोर्चा जाणार नाही

24. आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयीन लढ्यात सरकारची पर्यायाने समाजाची बाजू मांडण्यास अपयशी ठरलेले महाअधिवक्ता कुंभकोणी यांचे अधिकार काढून घ्यावेत

25. महाराष्ट्रात 10 आॕक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाशी महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध नाही

Published by: Sandip Parolekar
First published: September 27, 2020, 6:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading