प्रितम पंडित, प्रतिनिधी सोलापूर, 24 जुलै : अभिनेता शाहीद कपूरची फर्जी नावाची सिरीज चांगलीच गाजली होती. या सिरीजमध्ये शाहीदने ज्या प्रकार बनावट नोटा छापल्यात तसाच काहीसाच प्रकार सोलापुरात घडला आहे. सोलापुरात बनावट नोटांचा छापखाना सापडलाआहे. तब्बल 5 लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी येथे बनावट नोटा खपवण्यासाठी आलेल्या चौघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता छापखान्याची माहिती मिळाली. मोहोळ तालुक्यात बनावट नोटा छापखाना चालवली जात असल्याची गंभीर बाब समोर आली.
मोहोळ येथील चिंचोली काटी गावात एका तरुणाच्या घरावर छापा टाकून अर्धवट छापलेल्या 4 लाख रुपयांचे बंडल जप्त केले आहे. याप्रकरणी 3 जणांना अटक करून सुमारे पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सुनील कोथिंबीर, आदित्य सातभाई, खादीर जमाल शेख, विजय वाघमारे, नितीन बागडे, जमीन सय्यद, ललित व्होरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ते पाठीमागून पळतच आले, तो खाली पडला आणि डोक्यातच झाडली गोळी, अंगावर शहारे आणणारा LIVE VIDEO) बार्शीत बनावट नोटा खपवण्यासाठी आलेल्या चार जणांना पोलिसांनी 19 जुलै रोजी ताब्यात घेतली होती. त्यानंतर बार्शी पोलीसानी पुढील चौकशी केली. मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी इथं ललित व्होरा यांच्या घरी छापा टाकला. तेव्हा त्याच्याकडून 80 हजार रुपयांच्या नोटा, कलर, प्रिंटर, कटर, पट्टी कागदावर बनवलेल्या अंदाजे तीन ते चार लाख रुपयांच्या अर्धवट छापलेल्या बनावट नोटा, दीड लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. हे रॅकेट बार्शी पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.