मालेगाव, 18 एप्रिल: नाशिक जिल्ह्यात मालेगाव हे शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलं आहे. संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात एका 35 वर्षांच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. मालेगावच्या जीवन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. मात्र रिपोर्ट येण्याआधीच या तरुणाची प्राणज्योत मालवल्याची माहिती सामान्य रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाने 4 जणांचा बळी घेतला आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मालेगावात आतापर्यंत 60 पेक्षा अधिक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शुक्रवारी सकाळी मृत्यू झालेले 81 वर्षीय पुरुष डॉक्टर, तर 13 तारखेला मृत्यू झालेल्या 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
हेही वाचा..पतीशी भांडण करुन घराबाहेर पडलेली महिला सापडली 'कोरोना'च्या तावडीत!
मालेगावात कर्फ्यू...
एकट्या मालेगावात 36 कोरोना रुग्ण आढळताच संसर्ग रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने हे कठोर पाऊल उचललं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मालेगाव शहरात कर्फ्यू आदेश जारी करण्यात आले आहेत. 30 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत मालेगावात पूर्णतः संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच मालेगाव शहरात 20 एप्रिलपर्यंत सर्व बँक बंद राहणार आहेत. शहर तसेच मालेगाव हद्दीपासून 2 किमी परिघातील सर्व पेट्रोलपंप देखील बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच हातगाडीवरुन भाजी विक्री आणि किराणा दुकाने यांना सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. या कर्फ्यूमधून वैद्यकीय सेवा, दूध व चारा आणि गॅस एजन्सी यांना वगळले आहे.
हेही वाचा..21 एप्रिलपासून संचारबंदी शिथिल होणार, या कर्मचाऱ्यांना मिळणार एसटीची विशेष सेवा
दरम्यान, सहा एप्रिलला सामान्य रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. सोबतच आणखी चार जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले होते. एकाच वेळी पाच रुग्ण सापडताच नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मालेगाव गाठत कृषी मंत्री आणि यंत्रणेसोबत बैठक घेत सर्व आढावा घेतला होता.
संपादन-संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Malegaon