मुंबई, 5 सप्टेंबर : महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फार मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील, मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर परराज्यातच नव्हे तर देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे तरुण मराठी अधिकाऱ्यांच्या जीवनाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या अनुभवाचा मराठी तरुणाईला प्रेरणा मिळावी, या हेतूने न्यूज 18 लोकमत डिजिटल खास तरुणाईसाठी Digital Prime Time Special लाइफ @25 हा विशेष कार्यक्रम सुरू करत आहेत. आज जाणून घेऊयात, मराठी मातीत जन्माला आलेले खान्देशचे सुपूत्र पण मात्र, ओडिशा राज्यात सेवा बजावत असलेले आएएस अधिकारी मनोज महाजन यांच्याबाबत. मनोज महाजन सध्या ओडिशा राज्यातील बालांगीर जिल्ह्यात तितिलागड याठिकाणी SDM या पदावर कार्यरत आहेत. मनोज महाजन हे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील रहिवासी आहे. तालुक्यातील आय.ए.एस. झालेले पहिले मानकरी होण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. मनोज महाजन यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आत्मविश्वास जिद्द, चिकाटी, परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळते. स्पर्धा परीक्षेत यशस्वीतेसाठी हिम्मत खचू देऊ नका. आत्मविश्वास, सोशिकता ठेवा, एकत्र अभ्यास करा, चांगले मित्र-मैत्रिणी यांची संगत धरा. विचारांची देवाण-घेवाण करा. छत्रपती व्हा. संधीचे सोने करा. ध्येय निश्चित करा, असे ते विद्यार्थ्यांना नेहमी सांगतात. इंजिनिअरिंग पदवीधर - आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असलेल्या मनोज महाजन यांचे इयत्ता दुसरीपर्यंतचे शिक्षण पाचोरा तालुक्यातील गाळणच्या आश्रमशाळेत झाले. दहावीत 91 टक्के गुण, एम. जे. कॉलेजमध्ये शिकत असताना बारावीत 92 टक्के आणि सीइटीला 176 गुण मिळवले. यानंतर पुढे पुणे येथे शिक्षण घेत इलेक्ट्रॉनिक अॅन्ड टेलिकम्युनिकेशन या शाखेतून पदवी मिळवली. 2017 मध्ये त्यांनी 903 रँक मिळवली होती. मात्र, त्यांनी आएएस मिळाले नव्हते. म्हणून त्यांनी पुन्हा आणखी जोमाने अभ्यास केला. आणि 2019 मध्ये यूपीएससी परिक्षेत त्यांनी 125 वी रँक मिळवली. आई-वडिलच खरे गुरू आणि मार्गदर्शक - आपल्या जीवनात काहीतरी वेगळे करून देशासह आपल्या गावाचे नाव मोठे करण्यासाठी मनोज यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. त्यासाठी पुणे येथील चाणक्य मंडळात अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली यूपीएससी परीक्षेची तयारी केली. माझ्या यशाचे खरे गुरू व मार्गदर्शक माझे आई-वडिलच असल्याचे मनोज यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.