मुंबई, 22 नोव्हेंबर : राज्यात मागच्या चार दिवसांपासून थंडीची चाहुल लागली आहे. नाशिक, विदर्भ, मराठवाड्यात थंडीची लाट आली आहे. तसेच कोल्हापूर, सातारा पुणे आणि आता मुंबईतही तापमानात कमालीची घट झाली आहे. मुंबईत दमट वातावरण असल्याने नेहमी गरमी असते परंतु मागच्या 5 वर्षात यंदा मुंबईत थंडी जोरदार पडली आहे. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर थंडी कमी होती परंतु मागच्या दोन दिवसांपासून थंडीची चाहुल लागली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सांताक्रूझमध्ये किमान 17 आणि कमाल 31.7 अंश इतके तापमान होते. तसेच कुलाब्यात किमान 20.9 आणि कमाल 30.7 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. मुंबई किनाऱ्यावर उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे थंडीची तीव्रता येत्या दोन- तीन दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली. तर उर्वरित महाराष्ट्रातही थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हे ही वाचा : मुंबईत पार्किंगसाठी काही धोरण आहे का? हायकोर्टाचा शिंदे सरकारला सवाल
मुंबईसह ठाणे, अलिबाग, पालघर परिसरातही थंडीची तीव्रता वाढली आहे. या थंडीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर पाटर्यांचे बेत आखू लागले आहेत. विशेषतः या थंडीत अलिबागची प्रसिद्ध पोपटी खाण्यासाठी खवय्यांचे प्लॅनिंग सुरू झाले आहे. त्याचबरोबर माथेरान, महाबळेश्वरला पिकनिकचा बेत आखत अनेक मुंबईकरांनी तिथल्या हॉटेल्सचे बुकिंग केले आहे. महाबळेश्वरचा पारा 10.4 अंशांवर तर माथेरानचा पारा 15 अंशांवर घसरला आहे.
मुंबईत सर्वात कमी तापमानाची नोंद
मुंबईत मागच्या 5 वर्षांत सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मागच्या 5 वर्षांत 17 अंशापर्यंत तापमान कधीच पोहोचले नसल्याची माहिती दिली. मुंबईत 2020 मध्ये 19.4 अंश, 2019 मध्ये 20.5 अंश, 2018 मध्ये 19.3 अंश आणि 2017 मध्ये 18 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हे ही वाचा : राज्याचा पारा आणखी घसरला, पुणे झालं 'उणे 10', सर्वात जास्त थंडी कुठे?
परंतु यंदा मात्र 17 अंशापर्यंत तापमानाची नोंद झाल्याने मुंबईकरांना थंडीचा चांगलाच आनंद घेता आला. दरम्यान, सोमवारी शहरात एअर क्वालीटी 132 वर गेल्याने वायू प्रदूषणापासून थोडासा दिलासा मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Mumbai, Wave, Weather forecast, Winter, Winter session