मुंबई, 20 एप्रिल : राज्यात वेगवेगळ्या भागात नुकतेच काही उष्माघाताचे बळी गेले आहेत. वाढत्या तापमानामुळे खबरदारीचा उपया म्हणून राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांना 21 एप्रिल म्हणजे उद्यापासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेल्या शाळांचा अहवाल मागवला होता. त्यानुसार वाढत्या उष्णतेच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला.
सध्या असलेली उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना दि. २१ एप्रिल पासून सुट्टी देण्यात येत आहे. सुटीच्या कालावधीत ज्या शाळांना अतिरिक्त उपक्रम राबवायचे असतील त्यांनी ते सकाळच्या अथवा संध्याकाळच्या सत्रात घ्यावेत- शालेय शिक्षण मंत्री @dvkesarkar pic.twitter.com/Tsd1i9DseM
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 20, 2023
वाढत्या उष्णतेमुळे सुट्टी जाहीर : शिक्षणमंत्री दीपक केसरकर मंत्री केसरकर यांनी सांगितलं की, राज्यात उष्ण लहरींचा विचार करता उद्यापासून मुलांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. ज्या शाळांचे अभ्यासक्रम अद्याप चालू आहेत, त्या वगळता इतर प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक अशा सर्वच शाळांना उद्यापासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील ज्या शाळांची परीक्षा संपली आहे त्यांना सुट्टी मिळणार आहे. राज्यातील शाळांना 21 एप्रिलपासून सुट्टी सुरू होऊन ती 15 जूनपर्यंत असेल. विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा या 30 जून पर्यंत बंद राहतील असं राज्य शासनाने जाहीर केलं आहे. वाचा - महाराष्ट्र भूषण सोहळ्यात तो तर अपघात, राज ठाकरेंची नवी भूमिका राज्यातील वाढत्या तापमानामुळे पालक वर्ग चिंतेत होते. सीबीएसई आणि इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्याची शाळा प्रशासन आणि शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी करण्यात येत होती. खारघरमध्ये उष्माघाताने झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर नवी मुंबई पालक संघटना आणि त्यासोबत राज्यातील इतर पालक संघटनांनी सीबीएसई व इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवाव्यात, अशी मागणी केली होती.