Home /News /maharashtra /

सत्ताबदलानंतर फडणवीसांनी पहिल्यांदाच घेतलं अमित शाहंचं नाव, हे आहे उपमुख्यमंत्री व्हायचं कारण!

सत्ताबदलानंतर फडणवीसांनी पहिल्यांदाच घेतलं अमित शाहंचं नाव, हे आहे उपमुख्यमंत्री व्हायचं कारण!

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागच्या महिन्याभरात मोठा उलटफेर झाला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अमित शाह (Amit Shah) यांचं नाव घेतलं आहे.

पुढे वाचा ...
    नागपूर, 5 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागच्या महिन्याभरात मोठा उलटफेर झाला. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shivsena MLA) 39 आणि 11 अपक्ष अशा जवळपास 50 आमदारांना घेऊन बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा मुख्यमंत्री होतील, हे निश्चित मानलं जात होतं, पण फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर करून धक्का दिला. एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर करतानाच आपण या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचं फडणवीस म्हणाले, पण दोनच तासांमध्ये फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोन तासांमध्ये नेमकं काय झालं ज्यामुळे फडणवीसांचं मतपरिवर्तन झालं, असे प्रश्न विचारले जाऊ लागले. आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले आहेत, त्यामुळे भाजपकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. काय म्हणाले फडणवीस? महाराष्ट्रातल्या या सत्तानाट्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अमित शाह (Amit Shah) यांचं नाव घेतलं आहे. 'मी सरकारच्या बाहेर राहीन, असं ठरलं होतं, पण सरकारमध्ये राहून काम करणं योग्य राहील, बाहेरून असंविधानिकपणे सरकार चालवणं योग्य नाही, असं आमच्या वरिष्ठांनी मला सांगितलं, त्यामुळे मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, यात मला कुठेच अपमान वाटत नाही,' असं फडणवीस म्हणाले. या संपूर्ण प्रवासात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून सोबत होते, असं सांगत फडणवीस यांनी अमित शाह यांचे आभार मानले. 'माझी उपमुख्यमंत्री व्हायची तयारी नव्हती, पण भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी फोन करून तुम्हाला उपमुख्यमंत्री करण्याचा विचार असल्याचं सांगितलं, यानंतर अमित शाहदेखील माझ्याशी बोलले. बाहेर राहून सरकारला मदत केली पाहिजे, अशी माझी मानसिकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा झाली तेव्हा त्यांची सर्वांची इच्छा मी सरकारमध्ये सामील व्हावं, अशी होती. सरकार चालवायचं असेल तर सरकारमध्ये राहणं गरजेचं आहे, असं वरिष्ठ म्हणाले. वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन करून मी निर्णय बदलला,' असं फडणवीस यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा हा प्रस्ताव मीच वरिष्ठांपुढे मांडला आणि त्यांनी तो स्वीकारल्याचही प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली, तसंच उपमुख्यमंत्री म्हणजे समांतर मुख्यमंत्री नाही, मी उपमुख्यमंत्रीच आहे, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेला टोला शिवसेनेतल्या चुका आमदारांकडून उद्धव ठाकरेंना सांगितल्या जात असतील आणि त्या त्यांच्या लक्षात येत नसतील, तर इश्वरच मालक आहे, असा टोलाही फडणवीसांनी हाणला. तसंच एका व्यक्तीने महाराष्ट्राचं राजकारण प्रदूषित केलं, त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा सल्लाही फडणवीसांनी संजय राऊत यांना दिला. शिवसेनेच्या खदखदीवर माझं आधीपासून बारीक लक्ष होतं, योग्यवेळी योग्य निर्णय घेतला, हेच तर राजकारण आहे, असं फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अजून त्यासंदर्भात बैठक झाली नाही, पण एक ते दोन दिवसांमध्ये बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Amit Shah, BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde

    पुढील बातम्या