जळगाव, 7 एप्रिल : जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी कापल्यानं नाराज आमदार स्मिता वाघ यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली आहे. स्मिता वाघ आणि त्यांचे पती उदय वाघ यांची देवकर यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाली.
भाजपने आधी जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण त्यानंतर त्यांची उमेदवारी कापून भाजपने उन्मेष पाटील यांनी तिकीट दिलं. त्यामुळेच स्मिता वाघ गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचं चित्र होतं. या पार्श्वभूमीवर झालेल्या देवकर-वाघ भेटीनं जळगावच्या राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर आणि नाराज वाघ दाम्पत्य यांच्यामध्ये झालेल्या या बैठकीचा तपशील समजू शकलेला नाही. स्मिता वाघ यांनी उमदेपणा दाखवत उन्मेष पाटील अर्ज भरत असताना हजेरी लावली. यानंतर उन्मेष पाटील यांचा प्रचाराचा नारळ फुटला तरी यांच्या प्रचार फेर्यांमध्ये वाघ दाम्पत्याची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे.
भाजपने ऐन वेळी आमदार स्मिता वाघ यांचा पत्ता कट करून आमदार उन्मेष पाटील यांना तिकिट दिल्यामुळे भाजपमध्ये उघड कलह निर्माण झाला आहे. उदय वाघ यांनी तर हा आपला कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याची टोकाची प्रतिक्रिया दिली होती. तर स्मिता वाघ यांनीही नाराजी व्यक्त केली होती. वाघ समर्थकांचा उद्रेकदेखील दिसून आला होता. त्यामुळे आता जळगावमध्ये काय राजकीय घडामोडी घडतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
VIDEO: तावडेंची हिम्मत असेल तर...मनसे नेत्याचं खुल्लं चॅलेंज