मुंबई, 25 एप्रिल : काही राजकीय पक्षांनी भोंग्यांसंदर्भात डेडलाईन दिली आहे. मात्र, भोंगे काढण्यासंदर्भात सरकार काही करणार नाही. ज्यांनी भोंगे लावले असतील तेच यांसंदर्भातील निर्णय घेतील, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
(Dilip Walse Patil) यांनी स्पष्ट केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मशिदीतील लाऊडस्पीकर (loudspeaker) संदर्भात महत्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते बोलत होते.
'3 तारखेला ईद आहे, माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे. आम्हाला कोणतीही दंगल, तेढ निर्माण करायचा नाही. राज्याचे स्वास्थ बिघडवायचे नाही. 3 मेपर्यंत सगळ्या मौलवींशी बोलून घ्या, त्यांना समजावून सांगा, भोंगे काढून घ्या, 3 मेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही, असा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे. राज यांच्या भूमिकेनंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. तर काहींनी त्यांचे समर्थनही केले आहे.
केंद्र सरकारने नियम करावा
वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळी भूमिका नाही. केंद्र सरकारनं देश पातळीवर एक नियम करावा आणि नियमांची अंमलबावणी देशभर करावी, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. सुप्रीम कोर्टाने रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंग्यांवर बंदी घातली आहे आणि इतर वेळी आवाजाची मर्यादा घालण्यात आली आहे, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी स्पष्ट केलं.
हे वाचा - 'मशिदीवरून जर भोंगे काढले तर आम्ही संरक्षण देऊ', आठवलेंचा मनसेला इशारा
गुढीपाडव्याच्या सभेत दिला होता राज ठाकरेंनी इशारा
'मी धर्मांध नाही..प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. यापूर्वी मशिदींवरील भोंग्याबाबत मी बोललो होतो. पण अजूनही ते सुरू आहे. यापुढे सरकारने मशिदीतील हे भोंगे काढले नाही तर त्या मशिदींबाहेर दुप्पट आवाजाने स्पिकर लावू आणि त्यात हनुमानचालीसा वाजवू', असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत दिला होता.
राज यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. मात्र, या अल्टिमेटमला मानण्यास मालेगावच्या मौलानांनी नकार दिला आहे. ऑल इंडिया इमाम काउन्सलिंगने मशिदीवरील भोंगे काढण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अजान नमाजसाठी भोंगे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या राजकीय स्वार्थासाठी राज ठाकरे हा वाद वाढवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.