अहमदनगर, 19 डिसेंबर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपूरमध्ये सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात लोकायुक्त कायदा येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यात लोकायुक्त कायदा संमत व्हावा यासाठी बरेचवेळा आंदोलनं केली होती. आता हा कायदा विधिमंडळात संमत होत असल्याची घोषणा झाल्यानंतर अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हा चांगला निर्णय घेतला आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही आता कायदा करत आहात, याचं महत्त्व तुम्हाला आज पटणार नाही. कायदा झाल्यानंतर लोक जेव्हा त्याची अंमलबजावणी करतील, तेव्हा तुम्हाला हा कायदा किती क्रांतीकारक आहे, हे लक्षात येईल,' असं अण्णा हजारे म्हणाले.
'माहितीचा अधिकार कायदा केला तेव्हा लोकांनी मला वेड्यात काढलं होतं. आज मात्र त्या कायद्याचा फायदा नागरिकांना होत आहे,' अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली.
देशासाठी, समाजासाठी, महाराष्ट्रासाठी काही चांगलं काम करायचं असेल तर तप करावा लागतो. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आंदोलनाला 12 वर्ष झाली, त्याचा फायदा देशातील नागरिकांना होईल, असा विश्वासही अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले फडणवीस?
'केंद्रात लोकपाल कायदा झाला, तसा राज्यात लोकायुक्त कायदा झाला पाहिजे, अशी मागणी अण्णा हजारे करत होते. युती सरकार होतं तेव्हा आम्ही अण्णांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवली होती, पण मधल्या सरकारने त्या समितीला गांभिर्याने घेतलं नाही, पण आम्ही त्या समितीला मान्यता दिली आहे. या अधिवेशनात नवीन लोकायुक्तांचं बील मांडणार आहे,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'मुख्यमंत्री, मंत्रिमंडळही लोकायुक्तांच्या कक्षेत येणार. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा समावेश लोकायुक्त कायद्यात समाविष्ट केलाय. सर्वोच्च न्यायलय अथवा उच्च न्यायलयाचे 5 न्यायाधीश पॅनलमध्ये असणार. लोकायुक्तांना पोलीस तक्रार दाखल करण्याचे अधिकार दिले आहेत. सरकारला न विचारता गुन्हा दाखल करण्याचे आदेश लोकायुक्त देऊ शकतात, कुणालाही अडकवण्यासाठी हा कायदा आम्ही केलेला नाही,' असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
'हजारे समितीने जो मसुदा आम्हाला दिलाय तसाच्या तसा आम्ही स्वीकारला आहे,' असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.