विरार, 23 एप्रिल: विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात (Virar Vijay Vallabh Hospital Fire) लागलेल्या आगीमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे आणि या घटनेमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. अतीदक्षता विभागास आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं असून त्यांनी या आगीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘ही घटना मोठी आहे. जे यास जबाबदार असतील त्यांची सूटका नाही. प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकार प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करत आहे.’
This is a big accident. Those found responsible won't be spared. The government will provide financial assistance of Rs 5 lakhs each to the families of those who lost their lives: Maharashtra Minister Eknath Shinde on Virar hospital fire incident pic.twitter.com/Gzku3m65Ff
— ANI (@ANI) April 23, 2021
या रुग्णालयांमध्ये बेसिक सुविधाच नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनेच्या रात्री आयसीयू पूर्ण भरलेलं होतं, मात्र याठिकाणी एकही डॉक्टर नव्हता असल्याचा आरोप एका मृत महिलेच्या मुलीने केला आहे. त्यांच्या आईची प्रकृती सुधारत होती आणि ही घटना घडली. त्यांच्या मते याठिकाणी साधा फायर एक्सटिंग्विशर देखील नव्हता. त्यामुळे आयसीयूतील रुग्णांचा एकतर होरपळून किंवा घुसमटून मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या रुग्णालयामध्ये सेंट्रलाईज एसी होता. या एसीचा स्फोट झाल्याने ही घटना घडली. यावेळी रुग्णालयातील आयसीयूमध्ये एकूण 17 पेशंट होते त्यापैकी 13 जणांच्या मृत्यू झाला आहे.