भाजपला धक्का : जातीचा दाखला रद्द झाल्याने 9 महिन्यातच स्वामींची खासदारकी धोक्यात?

भाजपला धक्का : जातीचा दाखला रद्द झाल्याने 9 महिन्यातच स्वामींची खासदारकी धोक्यात?

सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची खासदारकीच धोक्यात येऊ शकते. त्यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीने घेतला आहे.

  • Share this:

सोलापूर, 15 फेब्रुवारी : महाराष्ट्र भाजपच्या गोटात चिंता वाढवणारी बातमी आली आहे. सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची खासदारकीच धोक्यात येऊ शकते. त्यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत दिग्गजांना हरवून विजय मिळवणाऱ्या लिंगायत समाजातील आदरणीय गुरू असणाऱ्या जयसिद्धेश्वर स्वामी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर जात पडताळणी समितीचा निर्णय आज आला आणि समितीने जयसिद्धेश्वर स्वामींच्या जातीचं प्रमाणपत्र रद्द केलं

जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढताना वंचित विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्यांचा पराभव केला होता. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी उमेदवारी अर्जाबरोबर बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. पण हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली होती. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी तक्रार दाखल केली होती. हिंदू लिंगायत जात असताना बेडा जंगम जातीचा दाखला दिल्याचा आरोप त्यांनी यामध्ये केला होता. याप्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पुरावा म्हणून दिलेला दाखला संशयास्पद असल्याचं नमूद करण्यात आलं.

वाचा - विधानभवन परिसरात भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये शाब्दीक चकमक

आता जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी अडचणीत आली आहे.

जातीच्या दाखल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यावर सुनावणी घेणाऱ्या समितीचं काम दबावाखाली असल्याचं जयसिद्धेश्वर स्वामींच्या वकिलांनी म्हटलं आहे. मात्र, जिल्हा जात पडताळणी समितीने स्वामींचा अर्ज फेटाळून लावला. दक्षता समितीने अहवाल आपल्याला मान्य नसून आपण उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचं स्वामींच्या वकिलांनी सांगितले.

सोलापूर मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. त्यामुळे याठिकाणी इतर जातीच्या उमेदवारांना निवडणूक लढवता येत नाही. जात पडताळणी समितीनं जयसिद्धेश्वर स्वामी यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. या समितीच्या निर्णयाविरोधात स्वामी उच्च न्यायालयात दाद मागू शकतात.

 

First published: February 24, 2020, 3:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading