ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 12 मार्च : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election Result 2022) आता महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात पोटनिवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक (Kolhapur North Assembly by-election) जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिलला मतदान तर 16 एप्रिलला मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 24 मार्च ही शेवटची तारीख आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर बिनविरोध निवडणूक व्हावी, असा सत्ताधारी पक्षाचा मानस आहे. पण याआधीच्या राज्यातील झालेल्या पोटनिवडणुका पाहता कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी बघायला मिळणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. विशेषत: या निवडणुकीसाठी काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. तर भाजप त्यांच्या एका उमेदवाराला संधी देईल. अशी एकंदरीत ही दुहेरी लढत असणार आहे. ( शरद पवारांचं महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना इंजेक्शन? चंद्रकांत पाटलांचा नवा दावा ) महाराष्ट्र विधानसभेची 2019 च्या निवडणुकीत सर्वाधिक 105 जागांवर विजय मिळवूनही भाजपला राज्यात सत्तेपासून वंचित राहावं लागत आहे. शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने भाजप सत्ता स्थापन करु शकली नाही. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. सर्वाधिक जागांवर विजय मिळाल्यानंतही सत्ता मिळवू न शकल्याने भाजप नेते नाराज आहेत. त्यातून त्यांनी अनेकदा महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या भविष्यवाणी केल्या आहेत. यादरम्यान मधल्या काळात पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं कोरोनाने निधन झालं. त्यामुळे त्या जागेवर पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथी भालके यांना उमेदवारी जाहीर झाली. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर झाली. या पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने खूप ताकद लावली होती. अखेर या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे यांचा विजय झाला होता. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसेभेची ही तिसरी पोटनिवडणूक असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.