मुंबई, 26 ऑक्टोबर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या काही जागा घटल्याने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासाठी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीआधी ठरलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे शिवसेनेला सत्तेत समसमान वाटा मिळावा, यासाठी शिवसेना आग्रही आहे. तसंच हा वाटा न मिळाल्यास आमच्यासमोर इतरही पर्याय खुले आहेत, असंही शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र शिवसेनेला आता एक धक्का बसला आहे. ‘आम्हाला सत्ता स्थापन करण्यात रस नाही. जनतेनं आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. तो आम्ही मान्य करतो. भाजप आणि शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास शिवसेनेला भाजपच्या अटींवर पुन्हा एकदा सत्तेत सहभागी व्हावं लागू शकतं. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ‘मातोश्री’वर महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. तासभराच्या चर्चेनंतर ही बैठक संपली. मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आमदार आक्रमक दिसून आले. या बैठकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे 55 विजयी उमेदवार उपस्थित होते. मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला हवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचा अधिकृत प्रस्ताव लेखी स्वरूपात द्यावा, ज्यामध्ये ठरल्याप्रमाणे सत्तेचे समसमान वाटप असेल. त्यानंतरच सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेना चर्चा करेल, असा आक्रमक पवित्रा सेना आमदारांनी घेतला आहे. शिवसेना आमदारांनी गटनेता आणि मुख्यमंत्रिपदासाठी सर्व अधिकार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. VIDEO : उदयनराजेंना आस्मान दाखवणारे ‘पैलवान’ पवारांच्या भेटीला, रंगला गप्पांचा फड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







