महाराष्ट्रात अजब कारभार, या 2 जिल्ह्यांतील लॉकडाऊनचा आदेश अचानक घेतला मागे, लोकांमध्ये संभ्रम

महाराष्ट्रात अजब कारभार, या 2 जिल्ह्यांतील लॉकडाऊनचा आदेश अचानक घेतला मागे, लोकांमध्ये संभ्रम

कोरोना रुग्णांची (Corona Patients) वाढती संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून पुन्हा एकदा निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

  • Share this:

बुलडाणा, 12 मार्च : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची (Corona Patients) वाढती संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून पुन्हा एकदा निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. मात्र हे निर्णय घेताना शासन-प्रशासनामध्ये संवादाचा अभाव होत असल्याचं दिसत आहे. कारण राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेला लॉकडाऊनचा (Lockdown in Buldana and Akola canceled) निर्णय अचानक रद्द करण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात शनिवार आणि रविवार या दिवशी कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. मात्र हा आदेश अवघ्या दोन तासातच मागे घेण्यात आला. सायंकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतची संचारबंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे.

आस्थापने दोन दिवस बंद ठेवण्याच्या आदेशानंतर जिल्हाभरातून व्यापारी, व्यावसायिकांचा रोष पाहता जिल्हा प्रशासनाने शनिवार, रविवार या दिवशी संपूर्ण लॉकडाऊनचा आदेश मागे घेतला आहे. ही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली. दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचा आदेश कायम राहील, असंही दिनेश गीते यांनी म्हटलं. त्यामुळे सुरुवातीला दोन दिवस कडक संचारबंदीचा आदेश रद्द समजण्यात यावा, असं सांगण्यात आलं आहे. तसंच पूर्वीच्या आदेशाचे शुद्धीपत्रकही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.

हेही वाचा - शिवसेना नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचे आदेश पायदळी? शेकडोंच्या उपस्थिती बदलापुरात महिला दिन साजरा

दुसरीकडे, कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत अमरावती आणि अकोला या शहरांमध्ये प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. कारण या दोन जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. या पार्श्वभूमीवर अकोल्यातही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. मात्र शनिवारी व रविवारी होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आल्याची माहिती आता पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

दरम्यान, लॉकडाऊनसारख्या गंभीर निर्णयाबाबत होत असलेल्या धरसोडपणावरून लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 12, 2021, 5:58 PM IST

ताज्या बातम्या